“लेखणी माझी धारदार”
लेखणी माझी धारदार
देई लेखनास आधार
खुलविते व्यक्तिमत्त्व माझे
येई शब्दांना आकार
लेखणी माझा श्वास
लेखणी माझा ध्यास
लेखणीच्या सहवासात
माझा सार्थ विश्वास
लेखणीने दिली ओळख
तिनेच केले संस्कार
लेखणी आली हाती
झाले स्वप्न साकार
लेखणीस लाभते धार
समाजभान जागवताना
लेखणीस साजतो शृंगार
प्रेमभाव व्यक्त होताना
लेखणी माझी धारदार
करताना परिक्षण
लेखणी होते भारदार
लिहिताना समीक्षण
लेखणी हाती आली
विसरलो सारे त्राण
लेखणी हत्यार माझे
तिचा होतोय सन्मान
लेखणी माझा प्राण
लेखणीच स्वाभिमान
लेखणीसाठी ओवाळीन
मी माझे पंचप्राण
पांडुरंग एकनाथ घोलप
कर्जत,जि.रायगड
==========