‘म’ मराठीचा
चला चला रे जाऊ
गाऊ मायमराठीचे गान
क ख ग घ लिहू आता
‘म’ मराठीचा छान
मराठमोळी परखड
थोडी दुधावरची साय
लोभसवाणे रूपडे
पदरात झाकते माय
थोडा कोमल जरा रांगडा
गडी मातीत राबतो असा
सह्याद्रीला वेड लावतो
भुलवितो चकवा जसा
कधी वाणी बहीणाईची
कधी गुरूजींची माया
वरदहस्त डोईवर सदा
कसा जन्म जाईल वाया
म्हणून आधी गिरवावी
मायमराठीची ओवी
अमृताचा घडा उलटला
झेंडा अटकेपार रोवी
सविता धमगाये, नागपूर
============