किल्ले रांगणा; स्वाती मराडे

किल्ले रांगणा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड कोल्हापूर जिल्हयातील एक किल्ला. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयातील किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो. रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क उतार उतरून गडात प्रवेश करावा लागतो. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरून जाणाऱ्या छोटया वाटेने पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा लागतो. प्रवेशद्वार परिसराची रचना युद्धशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे आहे.

पहिल्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर बुरुजाच्या संरक्षणात लपविलेला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. याच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या दरवाजा पासून उजवीकडे एक तलाव व जांभ्या दगडात बांधलेली जोती आढळतात. या भागात दोन्ही बाजूने भक्कम तट असून त्यावर चढण्यासाठी जिने आहेत. हनुमंताचे शिल्प कोरलेला चोर दरवाजा आहे. येथून परतत माघारी दुसऱ्या दरवाज्याजवळ यायचे. समोरच उजव्या हातास वाडा आहे. येथे आत विहिर आहे. पुढे गेल्यावर गडाचा चार कमानींचा तिसरा भक्कम दरवाजा लागतो. सरळ पायवाटेने पुढे बारमाही भरलेला तलाव व अनेक समाध्या दिसतात. यानंतर ओढा पार करून आपण रांगणाई मंदिराजवळ येतो. येथे विष्णू व भैरवाचीही मूर्ती आहे. येथे फारसी शिलालेखाचा दगड व दीपमाळ आहे.

उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. जवळच कोरडी विहिर आहे. येथून पुन्हा तिसऱ्या दरवाज्यापर्यंत माघारी यायचे. तलावाकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यास गणेशमंदिर लागते. तटबंदीच्या बाजूने एक तलाव व काठावर देवळीमध्ये शिवलिंग आहे. तटाच्या बाजून पुढे चालू लागल्यावर काही पायऱ्या उतरल्यावर एक दरवाजा लागतो. याच्या डाव्या बाजूस तटबंदीमध्ये गोल तोंडाची विहिर आहे. पुढे गेल्यावर आपण तटबंदीने संरक्षित हत्तीसोंड माचीवर पोहोचतो. तटाच्या उजव्या हाताच्या उतारावर चिलखती बुरुज आहे. हा बुरुज पाहून आपण वर यायचे व सोंडेच्या टोकावर असलेल्या चोर दरवाज्यात उतरायचे. माथ्यावर बारा कमानी असलेला दगडात खोदून काढलेला हा दरवाजा आहे.

या दरवाज्यातून पायऱ्या उतरल्यावर आपण दरीच्या तोंडावर येतो, तेव्हा सावधपणा बाळगावा. तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपणास आणखी एक भव्य दरवाजा लागतो. या दरवाज्यातून उतरणारी वाट केरवडे गावात जाते. तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपण पश्चिमेकडील गोल बुरुज असलेल्या कोकण दरवाजाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. या दरवाज्यातून उतरणारी वाट कोकणातील नारुर गावास जाते. किल्ला परिसर जंगलझाडीचा व वन्य प्राणी वावर असलेला आहे त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागते.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles