“माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन”; अजित पवार
_निलेश लंकेंवर टीका करताना अजित पवार म्हणाले; सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल_
अहमदनगर: आज अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशाराच दिला आहे. अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है, माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल.’ निलेश लंकेंवर टीका करताना अजित पवार म्हणाले, गडी दिसायला बारीक दिसतो, मात्र लय पोहोचलेला आहे. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. कसं साधं घर आहे, कसे साधे आई-वडील हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण कळायला लागली.
अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पट्ट्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर, आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल. माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती है. अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली.