
बाबासाहेबाच्या ‘त्या’ पुतळ्यास आम्ही विरोध करू; आनंदराज आंबेडकर
मुंबई: ऐतिहासिक कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भीम अनुयायी येत असतात. त्यामुळं यंदा येथील कार्यक्रम निर्बंध मुक्त व्हावेत. 1 जानेवारी 2023 रोजीच्या कार्यक्रमांमध्ये निर्बंध शिथिल करावेत, अशी आग्रही मागणी आनंदराज आंबेडकर यांनी सरकारकडं केलीय.
माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमा इथं येत असतात. 2 वर्षे या कार्यक्रमावर निर्बंध होते. पण, सरकारनं यावर्षी हे निर्बंध लावू नयेत. या ऐतिहासिक विजयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी गाड्यांची संख्याही मोठी असते. मात्र, बऱ्याच जणांना तिथं चालत जावं लागतं. या विषयीही निर्णय झाले पाहिजेत. इथं वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सरकारनं नियोजित जागा द्यावी.’
कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील इंदू मिलमध्ये आले होते. इंदू मिलमध्ये जो पुतळा उभा करण्यात येणार आहे, त्यात दुरुस्ती आणि काही त्रुटी आहेत. जो डमी पुतळा बनण्यात आला आहे, तो बाबासाहेबांच्या चेहऱ्यासारखा दिसत नाहीये. यात हाताची ठेवण वेगळी आहे. बाबासाहेबांचा सर्वात सुंदर पुतळा मुंबईतील मंत्रालयासमोर आहे. या सारखाच पुतळा व्हायला हवा.
सध्याचा बाबासाहेबांचा डमी पुतळा आहे, तो फायनल करू नये. जर हाच पुतळा उभा राहिला गेला तर त्याला विरोध होईल, असा इशारा त्यांनी दिलाय. इंदू मिलसाठी मी खारीचा वाटा उचलला आहे, असंही आनंदराज आंबेडकर यांनी आवर्जून सांगितलं.