
लावणी सम्राज्ञीवर अक्षरश: भीक मागण्याची वेळ
अहमदनगर: एकेकाळची लावणी सम्राज्ञी जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या आणि शिट्यांनी गाजलं. जिच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं. ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. बस स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे.
शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं या लावणी सम्राज्ञींचं नाव आहे. एकेकाळी याच शांताबाईंनी लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला. लालबाग परळचं हनुमान थिएटर गाजवलं. त्यांची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला.
*तमाशा फडाच्या मालक बनल्या, पण..*
शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांचे पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला, बक्कळ पैसा मिळू लागला. मात्र अशिक्षित शांताबाईची फसवणूक झाली. अत्तार भाईंनी सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्धवस्त झाल्या. त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं. त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या. पती नाही, ना कुणी जवळचं नातेवाईक. त्यामुळे कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचं घर झालं.
व्हायरल व्हिडीओनंतर शोध सुरु
शांताबाईचे वय आज ७५ वर्षे आहे. मात्र विस्कटलेले केस, फाटकी साडी, सोबत कपड्यांचे बाजके अशा अवस्थेतील शांताबाई बस स्थानकावर आजही “ओळख जुनी धरून मनी” ही लावणी गात बसलेल्या असतात. शांताबाईची लकब, अदाकारी, हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी बघून कुणीतरी त्यांचा व्हिडीओ बनवून सोशल माध्यमांवर टाकला.
खान्देश भागातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडीओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. खरात यांनी दोन दिवस शांताबाईचा शोध घेतला आणि अखेर ती कोपरगाव बसस्थानकात आढळून आली. अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉ. अशोक गावीत्रे हे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले आणि शांताबाईंना वैद्यकीय मदत केली.
*शासनाकडून मदतीचं आवाहन*
शांताबाईंना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून हलाखीचे जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राज्य सरकारने त्यांना वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. अशोक गावीत्रे यांनी सांगितलं.
आज लावणीच्या नावाखाली वेडेवाकडे नाचणाऱ्या काही नृत्यांगणावर लाखो रुपये खर्च करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. मात्र शांताबाईंसारखे अनेक लोककलावंत आहेत जे काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने शासनासह समाजाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे.