
वजन आणि मोजमाप उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या 63 उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस
नवी दिल्ली: केंद्र सरकारने कायदेशीर मेट्रोलॉजी विभागाअंतर्गत वजन आणि मोजमाप उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या 63 उत्पादक/आयातदारांना अनुपालन तपशील दाखवण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर असलेल्या उत्पादक/ आयातदार / विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मॉडेलच्या मान्यतेचा तपशील, उत्पादक/ आयातदार / विक्रेता परवाना आणि वजनाच्या उपकरणांची पडताळणी करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे.
ई-कॉमर्स माध्यमावर ,वजन आणि मोजमाप उपकरणांचे काही उत्पादक / आयातदार, ग्राहकांना कायद्याच्या तरतुदींचे पालन न करता वजन आणि मोजमाप उपकरणे विकत आहेत, असे आढळून आले आहे . ई-कॉमर्स माध्यमावरील या अशा नियमबाह्य विक्रीमुळे सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून सरकारच्या महसूल उत्पन्नातही नुकसान होत आहे.
ग्राहकांचे हित आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी वजन आणि मोजमाप उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या 63 उत्पादक/आयातदारांना त्यांच्या वजन आणि मापन यंत्राच्या मॉडेलसाठी (कलम 22 अन्वये ) मान्यता घेणे आवश्यक आहे, उत्पादन परवाना (कलम 23)/ आयातदार नोंदणी (कलम 19), आणि कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा, 2009 अंतर्गत वजन आणि मापन यंत्राचे सत्यापन/मुद्रांक (कलम 24) करणे आवश्यक आहे.
याशिवाय वजन आणि मापन उपकरणांवर पॅकेज पूर्व स्थितीत नमूद केलेल्या तसेच ई कॉमर्स माध्यमावर जाहीर केलेल्या घोषणांचे कायदेशीर मेट्रोलॉजी (पॅकेज केलेल्या वस्तू), नियम 2011 च्या तरतुदींनुसार (नियम 6) पालन करणे आवश्यक आहे.