ज्येष्ठ गझलकार व कवी निलकांत ढोले कालवश

ज्येष्ठ गझलकार व कवी निलकांत ढोले कालवश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर प्रतिनिधी

कोवळया पिलांचा चारा शोधण्यास जाता
बेईमान दारापुढती अर्जदार झालो !
किती चुका झाल्या गेल्या, तमा काय त्याची?
आपुल्याच अपराधाचा साक्षीदार झालो !…

छंदमयतेचा लळा लावणारी ही गझल पहिल्यांदा सुरेश भटांनी ऐकली आणि भट एका लेखात म्हणतात, त्याप्रमाणे ती गझल त्यांना ‘चढलीच’. लेखकाचा शोध घेतला तेव्हा कळले ती निलकांत ढोले यांनी लिहिलीय. भट- ढोले मैत्रीपर्वाची ही पहिली सुरुवात. त्यानंतर तर भटांनी अनेक ठिकाणी त्यांची ही गझल स्वत:च्या चालीत सादर केली. तेव्हापासून निलकांत ढोले यांची गझल त्यांच्या मोरपंखी प्रतिमांमधून रसिक मनात अगदी आताआतापर्यंत ठिबकत राहिली अन् आज अखेर कायमची शांत झाली.

जेष्ठ गझलकार आणि कवी निलकांत ढोले गेले. वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या लाडक्या गझलेला मागे सोडून गेले. पण, त्यांच्या गझलेतील अनुभवांचे विभ्रम वाचकांना कायम रिझवत राहतील. कारण, त्यांची गझल होतीच तशी नक्षिदार. काजळकाळया नयनकडांवर स्वप्नांचे लवथवणारे झुंबर बांधणारी. गंधवतीला जडलेली नवरंगाची जणू चंदनबाधाच. आपल्या कल्पनेतील प्रेयसीचा आठव अस्वस्थ झाला की ढोले लिहायचे…

चंदणी गंधात न्हालो, ही तुझी लावण्यवेली

साजनी पाहून तुजला चंद्रमा जळणार आहे !

रम्य या कोजागिरीच्या सोहळयाला झिंग आली

सांग राणी एकटी तू कां अशी झुरणार आहे?

ढोलेंना निसर्गाचे अलवार सौंदर्य, प्रेमभावनेची हळूवार अभिरूची जशी खुणवायची तितक्याच तिव्रतेने ते सामाजिक अन्यायाविरोधातही प्रखर शब्दात प्रकट व्हायचे. कविता म्हणजे केवळ सौंदर्यपुजन नव्हे. कविता म्हणजे मानवी जीवनावर स्वार्थी शोषकांनी लादलेल्या कुरूपतेवरील प्रहार होय, हे त्यांचे स्पष्ट मत होते. समाजातील अन्याय बघणे असहय झाले की त्यांची शब्दरूपी सत्याची तलवार चमकायची व ते लिहायचे…

सोहळेच स्वातंत्र्याचे आम्हाला मंजूर नाही

या उदास वैफल्याची का उगा फिरविता द्वाही !

का न्याय रडे एकांती? अन्यास नाचतो नंगा

स्वार्थांध झुंडशाहीचा बेबंद माजला दंगा…

ढोलेंचा हा काव्यप्रवास असा बहुरंगी होता. ‘अग्निबन’, ‘कळा काळजाच्या’, ‘वेदनांची वेधशाळा’ हे कविता संग्रह, ‘वेदनांची वेधशाळा’ हा गजलसंग्रह. ‘सोहळे ऋतूंचे’ हा ललित लेखसंग्रह, अशी एकामागून देखणे शब्दसौंदर्य त्यांनी मराठी रसिकांना अर्पण केले. त्यांच्या अग्निबन या संग्रहाला तर ‘सोव्हिएट लॅण्ड नेहरू अवार्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सुरेश भटांना ते गुरू मानत, त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाने नीलकांत ढोले यांची गझल बहरत गेली. अनेक वृत्तपत्रांमधे त्यांनी लेखन केले. नागपूर आकाशवाणी, दूरदर्शनवरही त्यांचे काव्य प्रसारित झाले. विदर्भ साहित्य संमेलने, जनसाहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन, बहुजनवादी साहित्य संमेलन, गजल सागर प्रतिष्ठान, मुंबई द्वारा आयोजित गजल संमेलन, नागपूर उत्सवांतर्गत कविसंमेलन, आकाशवाणी, दूरदर्शन कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, दलित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या लौेकिकाची दखल घेऊनच जागतिक मराठी समेलनांतर्गत कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना सोपवण्यात आले होते. त्यांच्या गझलेतील गतिसूचक प्रतिमा विलोभनीय होत्या. विविधतेच्या हव्यासापेक्षा त्यांनी कायमच आत्मबळाच्या साक्षात्काराला महत्व दिले आणि म्हणूनच प्रतापी गर्जणारा हा शब्दशाहीचा शिकंदर, मायबोलीच्या प्रदेशी थोर मंदार झाला.

डिगडोह दहन घाटावर अंत्यसंस्कार

डिगडोह दहन घाटावर दुपारी २ वाजता ढोले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गजलकार हृदय चक्रधर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.

याप्रसंगी नरेंद्र माहुरतळे, प्रसेनजीत गायकवाड, प्रकाश दुलेवाले, ताराचंद चव्हाण, नरेंद्र बोकडे, सचिन काळबांडे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या, आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी डॉ संजय भक्ते यांनी ढोले यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles