
फुटाळा फाऊंटन शो ला राज ठाकरेंची भेट
नागपूर: नागपूरच्या फुटाळा परिसरातील म्युझिकल फाउंटेन शो ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले असताना नितीन गडकरींनी राज ठाकरे यांना म्युझिकल फाउंटन शो पाहण्याची विनंती केली होती.
गडकरींच्या विनंतीला मान देऊन राज ठाकरे फुटाळा फाऊंटन शो बघण्यासाठी आले. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी फुटाळा म्युझिकल फाउंटनला गाणसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्याचे जाहीर केले होते. ऑक्टोबर महिन्यात या म्युझिकल फाउंटनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
फुटाळा तलावातील हा देशातील सर्वांत उंच ‘संगीतमय कारंजी आणि लाईट शो’ प्रकल्प असल्याचे यावेळी नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना सांगितले. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून फुटाळा तलावात संगीतमय कारंजी प्रकल्प साकार झाला आहे. त्याचे प्रात्यक्षिक गेल्या काही महिन्यांपासून सुुरु आहे.