

पुण्यात भारतीय ‘नदी दिवस’ उत्साहात साजरा
_’जीवित नदी’ या संस्थेच्या उपक्रम_
अमृता खाकुर्डीकर, पुणे (प्रतिनिधी)
पुणे: पुणे शहराच्या मध्यभागी आणि काठाने मूळा-मूठा या नद्या वाहात आहेत, पण त्यांची अवस्था मात्र दयनीय आणि मृतप्राय अशीच आहे. म्हणूनच पुण्यातील ‘जीवित नदी’ या संस्थेच्या वतीने या नद्यांच्या शुध्दीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जातात. याच कामाच्या अनुषंगाने या संस्थेच्या वतीने ‘भारतीय नदी दिवस’ संभाजी पार्क येथे मोठ्या उत्साहात आणि अतिशय देखण्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेसह शहरातील सुमारे दहा विविध पर्यावरणप्रेमी संस्थांच्या सहयोगाने ‘भारतीय नदी आठवडा’ साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून दि.२२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘नदी दिन’ कार्यक्रमात नदी स्वच्छता जागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नदीकाठ परिसरात राहाणा-या लोकांमध्ये नदीप्रदूषण व शुध्दीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी “आओ नदीको जाने” हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
यामध्ये शालेय मुलांना खास सहभागी करून घेण्यात आले होते. मुलांवर लहान वयातच नदी संरक्षणाचे तसेच पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचे संस्कार झाले तर त्यांचे निसर्गाप्रती प्रेम वाढून एक सजग दृष्टीकोण तयार होईल व त्यांचे दैनंदिन जीवनातील वर्तन अधिक जागरूकतेने होईल, मोठी झाल्यावर हिच मुले पर्यावरण प्रेमातून आपल्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. याशिवाय, याप्रसंगी नदीची जपणूक करण्याचा संदेश देणारी दोन पथनाट्ये सादर करण्यात आली.
नृत्य व गाण्याच्या सादरीकरणातून सुध्दा हाच विषय काही कलाकारांनी रंजकपणे मांडला.अशा त-हेने कलेच्या सादरीकरणातून नदी वाचवण्याचा संदेश उपस्थितांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचवण्याचा उद्देश होता, अशी माहिती आयोजकांनी यावेळी बोलताना दिली. एकूणच नळातून पाणी घरपोच यायला लागल्यापासून नदीशी तुटलेली नाळ परत जोडण्याचा हा साऱ्या संस्थांचा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचा अभिप्राय उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. पर्यावरण विषयक स्पर्धेत विजयी झालेल्या मुलांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
या कार्यक्रमात बालरंजन केंद्राची मुले खास सहभागी झाले होते. त्यांनी ‘ नदी बचाव’, ‘ नदी वाचवा’, ‘नदी स्वच्छ राखा ‘ असे संदेश असलेले फलक हाती घेऊन काढलेला ” रिव्हर मार्च ” लक्षवेधक ठरला.