प्राजक्तांगणात’ फुलांचे चांदणे, झाडावर रात्रीच लगडलेले असतात; स्वाती मराडे

‘प्राजक्तांगणात’ फुलांचे चांदणे, झाडावर रात्रीच लगडलेले असतात; स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी..”

‘प्राजक्तसडा’ पाहिला की, हमखास आठवते ग.दि. माडगूळकरांचे हे गीत. पारिजातक म्हणजे स्वर्गातील झाड. श्रीकृष्णाने एकदा स्वर्गातून ही फुले आणली नि रूक्मिणीला दिली. सत्यभामेला हे कळताच तिने प्राजक्तवृक्षच हवा म्हणून हट्ट केला. कृष्णाने झाड तर आणले पण अशा ठिकाणी लावले की त्याच्या फुलांचा सडा रुक्मिणीच्या दारात पडू लागला..फुलून गेले तिचे अंगण.. दिसू लागले प्राजक्तांगण.. हाच सत्यभामेच्या मनातील भाव कवीमनाने या गीतातून अलगद टिपला.

शुभ्र दलांचे मंडल..सूर्यासम केशरी आभा ल्यालेला केशरी देठ व सुगंधाचं भरभरून दान देणारं हे फूल पाहताच मन‌ विभोर होऊन जातं. हे फुलांचे चांदणे मात्र झाडावर रात्रीच लगडलेले असते. सूर्यकिरणांचा स्पर्श होताच पायरवही न करता ते अलगद ओघळतं. त्या रविराजाचे किरण धरेवर पडतानाच स्वतःला त्यावर झोकून देऊन ते त्यांचे स्वागत तर करत नसेल ना..? की त्या कथेतील राजकुमारी ‘प्राजक्ता’ रविकिरण पाहताच वेदना लपवत असेल..किंवा कदाचित चांदण्यांना धरेच्या कुशीत पहुडण्याचा मोह होत असावा नि सकाळ होताच ते प्राजक्तफुलांच्या रूपाने मातीवर लोळण घेत असावं.

‘मनमोहक हा प्राजक्तसडा, की पहुडलंय चांदणं,
रेखिली फुलांनी रंगावली, हे सजले प्राजक्तांगण.’

सकाळी सकाळी झाडाखाली उभे राहून झाड हलवले तर, वरून होणारा प्राजक्तवर्षाव मऊ मुलायम गुदगुल्या करत दवाचीही स्पर्शानुभूती देतो. प्राजक्त स्वर्गीय वृक्ष त्यामुळे खाली पडलेली फुलेही देवाला चालतात. हा फुले वेचण्याचा देखील सोहळा मनात आठवण रूपात घर करून राहतो. हात लावताच मलूल होणारी ही फुले.. अगदी कवी मनासारखेच संवेदन जपणारी.. त्यामुळे गजरा किंवा हाराऐवजी मन भरून पहावा तो प्राजक्तसडाच. सडा टाकून फुलांचा रिता होतो प्राजक्त..लयलूट करत सुगंधाची जगणंच त्याचं विरक्त..!

आज गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र प्राजक्तफुलांचा सडा सांडलेले अंगण ‘प्राजक्तांगण’. पारिजातकासोबत अनेकांच्या अनेक आठवणी जुळलेल्या असतात.. एक भावनिक नाते तयार झालेले असते. शिवाय या वृक्षाशी संबंधित काही कथाही आढळतात. कुणाच्या आठवणी, कुणाचे भावबंध, कुठे कल्पना तर कुठे कथांचा सार.. लेखणीतून उतरवत आजच्या रचना साकार झाल्या. श्रावणात फुलणारे हे फूल ऐन उन्हाळ्यातही चारोळीरूपाने गंधित होऊन बहरून आले. सर्व सहभागी सारस्वतांचे हार्दिक अभिनंदन व पुढील लेखणीस शुभेच्छा.
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ स्वाती मराडे,इंदापूर,जि.पुणे
मुख्य परीक्षक, लेखिका ,कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles