
च़द्रकांत पाटलांवर पिंपरीत शाईफेक
पुणे – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. चिंचवड गावांमध्ये चंद्रकांत पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता त्यांच्यावर हा शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी चळवळीतला माणूस आहे. आपण कुणालाही घाबरत नाही. मी दिलगीरी व्यक्त केल्यानंतरही हा हल्ला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाला धक्का लावत आहे. विरोध लोकशाही मार्गाने करायचा. सध्या झुंडशाही चालू आहे. ही झुंडशाही चालणार नाही. शब्दाला शब्दाने टक्कर द्यायला हवी, असही ते म्हणाले.
पाटील पुढं म्हणाले की, गिरणी कामगाराचा पोरगा या स्टेजपर्यंत आला हे झेपत नसल्याने सरंजामशाहीकडून हल्ले होत आहे. हे चुकीचे पायंडे पडले आहेत. या प्रकरणात पोलिसांना दोष देण्याचा कारण नाही. कार्यकर्ते आले आहेत. पोलिसांना कस कळेल की, कोणता कार्यकर्ता आहे आणि कोण बदमाश आहे.
दरम्यान ही लोकशाही नाही, झुंडशाही आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. मी पैठणला बोललो त्याचा विपर्यास झाला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर १०० मार्कांचा अभ्यासक्रम सुरु करायला हवा, असंही पैठणच्या कार्यक्रमात म्हणालो होतो. मात्र मीडियाने हे दाखवलं नाही, याची खंतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
चित्र सौजन्य: ए बी पी माझा