
“साहित्यिकांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक वंदन”; डाॅ. अशोक कामत
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: “शताब्दी साजरी करण्याच्या निमित्ताने थोर साहित्यिकांच्या साहित्याला उजाळा देऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याची कृतज्ञता मनात जपून ठेवू” असे भावपूर्ण गौरवोदगार प्रसिध्द तत्त्वचिंतक व संत साहित्याचे प्रगाढ अभ्यासक डॉ.अशोक कामत यांनी काढले. समीक्षक डॉक्टर व.दि.कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक पा.ना.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं. वसंतराव गाडगीळ उपस्थित होते.
अ.भा.साहित्य परिषद, पुणे आणि गुरुकुल प्रतिष्ठान, पुणे यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले. ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. व.दि.कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक पा.ना.कुलकर्णी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त या कार्यक्रमात दोन्ही मान्यवर लेखकांच्या साहित्यावर आधारीत सादरीकरण करण्यात आले. प्राचार्य श्याम भुर्के, डॉ.अनुजा कुलकर्णी, कवी दीपक करंदीकर, सौ.आरती मोने ,सौ.शुभदा वर्तक हे लेखक – कवी या सादरीकरणात सहभागी झाले होते. पंडीत वसंतराव गाडगीळ यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
कै.व.दि.कुलकर्णी- यांच्या कन्या कविता निरगुडकर आणि कै.पा.ना.कुलकर्णी-यांच्या कन्या डॉ.स्मिता कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमास खास निमंत्रित होते. अ.भा.साहित्य परिषद, पुणे आणि गुरुकुल प्रतिष्ठान, पुणे या दोन्ही संस्थाचे पदाधिकारी व रसिक श्रोते कार्यक्रमास उपस्थित होते.