
‘जादुई गंधाचा कुसूमाकर रचनांमधून आला’
पहिला पाऊस मातीत मिसळावा नि अवघा आसमंत गंधाने भारून टाकावा.. तो दरवळ हृदयकुपीत भरून ठेवावा. वर्षातून एकदाच मिळणारं हे दान मनात चिरंतन करावं. देवघरात चंदन उगाळावं अन् सगळा मनगाभाराच गंधित होऊन जावा. सणकून भूक लागलेली असावी आणि तेव्हाच चुलीवर खमंग भाजलेल्या भाकरीचा वास यावा. त्या वासानेच दोन घास जास्तीचे जावेत. पिकत घातलेल्या आंब्याच्या खोलीत पाय ठेवावा अन् मधुर वासानेच आधी मनाची तृप्तता व्हावी. आंबाच कशाला कैरीच्या वासानंही तोंडाला पाणी सुटावं. मोगरा फुलला की त्याच्या गंधात हरवून उन्हाच्या झळाही सुसह्य व्हाव्यात. उन्हात जणू सुगंधी चांदणं पडल्याचा भास व्हावा. निशिगंधानं फुलून रात्र धुंद करून टाकावी.. त्या यामिनीसही त्या गंधानं वेड लावावं. केवडा तर केवळ पानच.. पण गंधाने मोहित होऊन सर्पराजानं त्याचं रक्षण करत थांबावं. हिरव्या चाफ्यानं सोनेरी रंग पांघरत.. श्वासांना गंधाची मोहिनी घालत त्याचा शोध घेण्यासाठी पावलांना ओढ लावावी. पारिजात, जाईजुई, सायली, शेवंती.. सगळेच गंध कसे आपापला वेगळापणा जपत दरवळणारे.
सुगंध.. परिमल.. दरवळ.. आणि रंगोत्सव.. बहुतेक तो कुसूमाकर हेच चैतन्याचे दान घेऊन येतो आणि शिशिराची उदासी दूर करतो. उन्हाळझळांनाही मनमोहक करतो. सगळ्यांनाच लुभावणारे हे सगळे ‘जादुई सुगंध..’ याच वसंतातील आणखी एका जादुई सुगंधाने माझे मनच नाहीतर अंगणही गंधित करून टाकलंय. तो गंध म्हणजे बकुळ फुलांचा. सावळे पणाची शाल पांघरत.. साधेपणा जपत.. फांदीवरील कांडी न् कांडी कळ्यांनी लगडते तेव्हा त्या अस्तित्वाची कुणी दखलही घेत नाही.. पण कळ्यांची फुले होताच.. अंगणात नव्यानेच आलेले कित्येकजण विचारतात. किती छान अत्तरासारखा वास येतोय. कशाचा आहे..?
झाडाकडे बोट करून दाखवले तरी सहजासहजी लक्षात येत नाही त्यांच्या तेव्हा हलकेच चार-पाच फुले ओंजळीत घेऊन दिली की प्रचिती येते बकुळ फुलांच्या जादुई सुगंधाची. सहजासहजी लक्षातही न येणारं हे फूल मग क्षणात मन व्यापून टाकतं. जणू सांगत राहते तुमची महती दिसण्यावर नाहीतर तुम्ही काय आहात या असण्यावर आहे. कर्तृत्वाचा सुगंध पेरला की दिसणं गौण ठरतं हेच खरं.
तसंतर बकुळ फुलांचं केवळ हे झाडच नाहीतर बकुळा नावाच्या माझ्या एका सखीनेही असाच माझ्या मनाचा एक स्पेशल कप्पा गाठलाय. साधेपणा जपत सद्गुणांचा गंध ती कायम लुटत असते. प्रेम, आदर, माया, कर्तव्य, त्याग, नम्रता हे सगळेच गुण तिच्याकडे ठासून भरलेत. त्यामुळेच पतीसाठी किडनी दान करताना तिचं पाऊल जराही अडखळलं नाही. चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेली बकुळफुलांची ओंजळ पाहून तिचा उल्लेख केल्याशिवाय राहवलं नाही. कदाचित गुणांचाही जादुई सुगंध असेल हा.
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
==========