
‘देहाच्या काड्या होईस्तोवर राबणा-या बळीराजाची उपेक्षाच’
‘लाल वादळ
आगेकूच हक्काची,
व्यथा पोटाची’
देह जाळणारं ऊन असो, वा भयाण सोसाट्याचा वारा..कि बरसत असोत, तुफानी पावसाच्या जीवघेण्या धारा.. सारंच सोसत काळ्या मातीत राबतो निधड्या छातीचा रापलेल्या देहाचा शेतीचा राणा. धरतीला सुजलाम् सुफलाम् बनेस्तोवर लेकरांसाठी रात्रंदिन राबराब राबणारा अन्न व अर्थव्यवस्थेचा बळीरूपी हाच खरा शेतीचा कणा..!
झिजतो अविरत सर्वांच्या पोटासाठी..बनवतो उजाड माळरानासही अन्नरूपी सोन्याची खाण..पिकवतो साऱ्या जगासाठी तरीही तो मात्र कर्जाच्या ओझ्याखाली अर्धपोटी..गळफास, उपासमार, दारिद्र्य त्याच्याच माथी.. कायमच काळोखाचे नभ त्याच्या डोक्यावरती..पोशिंद्याची उपमा जरी पारतंत्र्यात जगतो बळी. देहाच्या काड्या होईस्तोवर जगाला भुकेची सावली देण्यात..देहाचा नांगर करतो..मनाची मशागत करतो,बळी ‘राजा’ असूनही तो श्रमिक मजूरच.आजच्या घडीला सर्वात जास्त त्याचीच उपेक्षा..!
‘लाल वादळ
आगेकूच हक्काची,
व्यथा कर्जाची’
भांडवलशाही व श्रमिक विरोधी धार्जीण्या धोरणांचा जाब विचारण्यासाठी शेतमालाला योग्य भाव उपलब्ध करून देण्यासाठी, सातबारा कोरा व्हावा,वीज माफी, बारा तास पाणी पुरवठा अशा अनेक रास्त मागण्यांसाठी बळीचा मोर्चा विधान भवनावर धडक देण्यासाठी मुंबईच्या दिशेने दिंडोरी नाशिक येथून मार्गक्रमण करत असतानाचं हे दृश्य..
शेतीच उद्योगाची जननी आहे, हरित क्रांती श्वेतक्रांती कृषी क्षेत्रातील समस्यांचा निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांचा मनोबल उंचावण्यासाठी व कृषीच्या व्यथा दूर करण्यासाठी नाशिक ते मुंबई हे शेतकरी आंदोलन म्हणजेच लाँग मार्च काढण्यात आला त्यात जवळपास 200 किमीचा प्रवास सात दिवसात उन्हातान्हाची पर्वा न करता अनवाणीपणे आदिवासी व शेतकरी बांधवांनी खंबीर मनाने उचललेले हे पोटाकरीता, भविष्याकरिता उचललेले हे पाऊल.
शेतकरी वर्गाच्या व्यथांचा तळ धुंडाळून वास्तवाला चितारणारं लेखन व्हावं. कृषीमनाच्या कोंडमाऱ्याचे वेदनाविष्कार जिव्हाळ्याने लेखणीतून उतरावेत,या आंदोलनास साहित्याची जोड मिळाली तर आंदोलन प्रभावाच्या तीव्रतेला पाठबळ मिळेल व प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागतील कदाचित..या समयसूचक दूरदृष्टीने लेखणीच्या माध्यमातूनही शेतीची दुर्दशा थांबून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सन्मानाचे दिवस खेचून आणण्यात शक्तिशाली साहित्याची नवी पिढी जन्माला यावी ही अपेक्षा.
प्रा. तारका रुखमोडे
अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
========