
कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यक या पदाची जाहिरात स्थगीत करण्याची मागणी
नागपूर: महापालिकेच्या आस्थापना विभागामार्फत दिनांक २७ मार्च २०२३ रोजी कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यक या तीन पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून प्रत्यक्ष मुलाखत दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी आहे. सदर जाहिरात मध्ये विधी अधिकारी सहाय्यक हे तीन पदे खुल्या संवर्गातील आहे.
जेव्हा की, मनपाविधी विभागाअंतर्गत विधी सहाय्यकाची एकूण १२ पदे मंजूर आहेत. सन २०१९ मध्ये मनपा मार्फत सदर पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली व एकूण १२ पैकी १० पदावर मनपातर्फे विधी सहाय्य नियुक्त करण्यात आले होते. १० विधी सहाय्यक मनपाचे विधी विभागात सन २०२१ पर्यंत कार्यरत होते. परंतु सन २०२० ते सन २०२१ हा कालावधी कोरोना काळ असल्याने १० विधि सहाय्यक यांना मे २०२१ नंतर पुढील कालावधी करिता एक्सटेन्शन देण्यात आले नाही. मात्र कोरोना काळ संपल्यानंतर मनपाला त्यांची सेवा घेता आली असती.
परंतु असे न करता दिनांक २७ मार्च २०२३ रोजी विशिष्ट अशा केवळ खुल्या संवर्गातील तीन कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यकाची नियुक्ती करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात आरक्षण कायद्याला (बिंदू नामावली) धरून नसल्याने ही जाहिरात मागासवर्गीय समाजावर अन्याय करणारी आहे. त्यामुळे ही जाहिरात तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे । महापालिका आयुक्तांनी यावर तात्काळ निर्णय न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही नागपुरातील वकील मंडळींनी दिला आहे ।
आजही मनपात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व इतर भटक्या जमाती प्रवर्गाकरिता विधी सहाय्यकाची पदे महापालिकेच्या आस्थापणेवर रिक्त आहे.
तरी सुद्धा आपल्या कार्यालयामार्फत सदर पदाची जाहिरात देतांना आरक्षण कायद्यानुसार मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचा विचार करण्यात आला नाही. केवळ विशिष्ट अशा खुल्या प्रवर्गाचा विचार करून व त्यांना प्राधान्यक्रम देऊन आपल्या कार्यालयाने जाहिरात दिल्याचे दिसून येते. त्यामुळे मनपा कार्यालयाने आरक्षण कायद्याविरुद्ध अवलंबविलेले धोरण बघता हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व इतर भटक्या जाती प्रवर्गाच्या उमेदवारांवर अन्याय आहे.
करिता दिनांक २७ मार्च २०२३ रोजी कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यक या पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात मागे घेण्यात यावी व आपल्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या विधी सहाय्यक या सर्व पदाची नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून सर्व जातीमधील उमेदवारांना सदर पदाकरिता अर्ज करण्याची संधी प्रदान करण्यात यावी, जेणेकरून सर्व मागासवर्गीय जाती प्रवर्गातील उमेदवारांना न्याय मिळेल, आणि त्यांना मनपा सारख्या लोकाभीमुख संस्थेची सेवा करता येईल.