
सावर रे मना
संकटे जरी किती कोसळली
वादळे जरी किती भिडली
छाताडावर त्यांच्या पाय रोवूनी
सावर रे मना,सख्या सावर रे मना
अवकाळी नी अतिवृष्टीचा फेरा
शेतीचा वाटे जरी व्यर्थ पसारा
परी प्रयत्नांवरी विश्वास ठेवूनी
सावर रे मना,सख्या सावर रे मना
जीवनी सुखदुखाची नित छाया
उगा कशासी होई कातर काया
आव्हानांना धैर्याने भिडूनी
सावर रे मना,सख्या सावर रे मना
आपल्या आयुष्याचे करण्या सार्थक
सदैव पाऊल तू पुढेच टाक
निराशेच्या तमा नष्ट करूनी
सावर रे मना, सख्या सावर रे मना
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली