
दारूच्या नशेत वर्गातच झिंगलाय गुरूजी; शिक्षणाधिका-यांनी घेतली दखल
पुणे: बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सजग नागरिकाने अचानक शाळाभेट केल्याने हा प्रकार समोर आला.
ही घटना बारामती तालुक्यातील तरडोली येथील भोईटे वस्ती येथील शाळेतील आहे. याबाबतचा व्हिडिओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
ही घटना भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. या शाळेत 25 विद्यार्थी शिकत आहेत. या शिक्षकाबाबत गेल्या वर्षी देखील तक्रारी हाेत्या. वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र शिक्षकास त्याचे साेने करता आले नाही.
चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद गुरुजी शाळेत पहावयास मिळाले. वर्गातच शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेले होते. भरपूर दारू प्यायल्याने ते तर शुद्धीत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले. संबंधित नागरिक म्हणाले या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. त्यावरून संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे.
या शिक्षकाची वैद्यकीय तपासणी होईल जे तपासणीत येईल त्यावर कडक कारवाई होईल असे शिक्षणाधिकारी गावडे यांनी सांगितले. तसेच मुख्याध्यापकांना देखील नोटीस बजावली असल्याचे गावडे यांनी नमूद केले.