
भूगंध
चातकासम ग्रीष्म ऋतूत
आतुरता लागे पावसाची
सूर्याला झाकून मेघ दाटता
पूर्ण होई प्रतिक्षा सृष्टीची
नभांगणात कडाडू लागल्या
लख्ख सौदामिनीच्या तारा
मृग वर्षेच्या सरीवर सरी
अवनीवर धोधो पाऊसधारा
थंड सरसर शिरव्यांनी
तप्त अवनी तृप्त झाली
मंद धुंद भुगंधाने
अवघी सृष्टी मोहरुनी गेली
दिसे सृष्टीचे रुप मनोहर
चोहुकडे हिरवळ दाटली
पानात हिरवी पालवी
नवसृजनाची भरुनी गेली
सुनिता लकीर आंबेकर
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव