
‘आई वडीलांच्या कष्टांची जाणीव असलेलेच खरे श्रीमंत’; नरेशभाऊ शेळके
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेच्या परीक्षणावरील प्रेरणादायी प्रतिक्रीया_
बुलढाणा/ सिंदखेड राजा: जगातील सर्वात श्रीमंत आणि सुखी माता पिता कोण असतील तर त्यांची मुले हे डॉक्टर , इंजिनियर, अधिकारी किंवा खूप पैसे कमवणारे झाले हे नाही तर ज्या लेकरांना आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी उपसलेल्या कष्टाची जाणीव असते हे आई-वडील माझ्या मते जगातील सर्वात श्रीमंत आहे. असे मत नरेशभाऊ शेळके यांनी व्यक्त केले. मराठीचे शिलेदार समूहात काल संपन्न झालेल्या बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या ‘स्वंयसिद्ध’ या विषयावर मुख्य परीक्षक, प्रशासक व कवयित्री लेखिका सौ सविता पाटील ठाकरे यांनी लिहलेल्या परीक्षणावर नरेशभाऊंनी प्रेरणादायी प्रतिक्रीयात्मक मत व्यक्त केले.
ते पुढे लिहतात, आपण मुलांना आजच्या स्पर्धेच्या बाजारात उतरवितो, त्याला एवढे मार्क मिळाले पाहिजे त्याचा या कॉलेजला नंबर लागला पाहिजे. तो हे झालं पाहिजे, तो ते झाला पाहिजे. या नादात तो शिक्षण घेऊन एक चांगला नागरिक झाला पाहिजेत हे मात्र विसरतो. शिक्षणाबरोबरच त्याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे; तरच त्या शिक्षणाचा उपयोग होईल. डिगऱ्यांच्या नादात संस्कारा अभावी जर तो काही वाईट व्यसनाकडे वळला तर त्या डिग्र्या मात्र कवडीमोल आहेत.
बरेच मुले मोठे झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना विसरतात व त्यांच्यावर वृद्ध आश्रमात राहण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्यासमोर पश्चातापाशिवाय दुसरा मार्ग राहत नाही. सर्वच मुलं हे काही डॉक्टर इंजिनिअर किंवा अधिकारी होणार नाहीत. मुलाचा कल बघा त्यानुसार त्या त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन त्याला करा हे करत असताना त्याच्यावर चांगले संस्कार टाकत तो एक आदर्श व सक्षम नागरिक कसा होईल याकडे लक्ष द्या. सविताजी तुम्ही खूप चांगली मांडणी करत विषयाचं गांभीर्य समोर आणलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन..!