आई..

आईपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा तथा मुख्य संस्थापक आदरणीय राहूल दादा यांनी हायकू चित्रातील…. ‘आपल्या बाळाला छातीशी लावून असलेली निर्विकार नजरेतून बरेच काही सांगून जाणारी एक साधी भोळी आई’. त्यातून दादांना बरच काही सांगायचं असेल कदाचित, तो थोडासा प्रयत्न मी माझ्या परीनं केलेला आहे. प्रत्यक्ष चित्र बघून मला माझ्याच आईची आठवण झाली.अगदी बालपणीच आईचे कृपा छत्र हरविल्याने.. आम्हा लहान बहिण भावंडाची झालेली आबाळ, आई विना पोरक्या झालेल्या मुलांना कसे दिवस काढावे लागले?, दुसऱ्यांच्या हाताखाली कसे जीवन जगावे लागले ?, किती खस्ता खाव्या लागल्या ?, हे आम्हालाच ठाऊक. ‘जावे ज्यांच्या वंशा तेव्हा कळे ‘ म्हणतात ते अगदी बरोबर आहे.

‘आई’ म्हटले की, ती आपल्या मुलांसाठी काय काय करते हे सांगायलाच नको. मुलांसाठी सर्वस्व अर्पण करणारी परंतु मी न पाहिलेली म्हणजे लहान असल्याने चेहराही माझ्या लक्षात नसलेली ‘माझी आई’, नातेवाईक, तिच्या मैत्रिणी, गावांतील आप्तेष्ट मंडळी , आणि माझे बाबा, यांच्याकडून जे माझ्या कानावर आले त्यानुसार माझ्या मनाने साकारलेली कविता

‘मनातील शल्य’

प्रतिमा न तुझी नयनी
परि ऐकल्या ज्या गुजगोष्टी
आई तुझ्या मायेपुढे
खुजी पडते ग सारी सृष्टी

घरी आल्या गेल्याचा
करीत असे मानपान
सांगती आजूबाजूचे ‘ तू ‘
जणू संस्काराची खाण

गेलीस आम्हा सोडून
काय घडला आमचा गुन्हा ?
व्याकुळ भुकेने आम्ही
परि पाजला न कुणी पान्हा .

मित्रांच्या आई मध्येच
शोधत असतो ग तुजला
बघुनी माय लेकराचे प्रेम
क्लेश होती ग मजला

होती म्हणे सर्वांची
लाडकी तू ग आई
म्हणूनही जवळ नेले
असेल देवाने तुलाही

परि त्याला आमुची
किंव कां न आली
चिमुकल्या पाखराची
माय कशी नेली ?

ना आम्हा समज कसली
ना चेहराही नजरेत
चिमुकला बाळ तुझा
जाई मृत्यूनंतरही कवेत

बघूनी केविलवाणे दृश्य
गहिवरली जनता सारी
म्हणे,..अश्रू रुपी पुरात
भिजलीत चिंब भारी

या जन्मात आमच्या
जरी मिळाला वनवास
आतुर तुज भेटण्या
लाभू दे तुझा सहवास

आई,..
या जन्मात आम्हा
जरी मिळाले न वात्सल्य
ये पुनर्जन्म घेऊनी
अन् मिटव मनातील शल्य
मिटव मनातील शल्य.

खरेतर… आई च्या निर्विकार नजरेतील भाव बघितले आणि सहज सुचले,
“तीला फक्त माहित,
मुलांसाठी व्हावे निर्झर .”
अन् निस्वार्थपणे मायेचा,
फोडावा नित्य पाझर”.

तेच हायकू रचनेत 5-7-5 या प्रमाणे शब्द गुंफण केली.

‘आईची माया
मुलांसाठी निर्झर
नित्य पाझर..’

वास्तविकता ” आई ” हा विषयच एवढा गहन आहे की जेवढे सांगावे तेवढे कमीच! जननी आणि जन्मभूमी या दोन्ही स्वर्गापेक्षा महान आहेत. म्हणूनच ‘जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है’ असे म्हटले जातात. प्राचीन काळापासून तर आजतागायत बऱ्याच साहित्यिकांनी (कवी/ कवयित्रींनी) ” आई” विषयी बरीच शब्द फुले वाहीली आहेत. म्हणजेच शब्दांकन केले आहे. ‘कुणाला ती दुधावरच्या सायीसारखी वाटते. तर कुणाला वासरातील लंगड्या गायी सारखी वाटते. ती एक प्रेमाचा अखंड निर्झर आहे आणि त्यातून नित्य प्रेमाचा पाझर असतो. आज आईची खुपच उणीव जाणवली. आईची सेवा करण्याची संधी तर मिळाली नाहीच पण तिच्या मायेलाही पारखे झालो , ती गेल्या नंतरच्या काही गत स्मृती जाग्या झाल्या , आणि थरथरत्या ओठी नकळत बोल फुटले.

‘ आई…, येना ग परत
डोळे आज पाणावले
तुझ्याच स्मृतीमध्ये
आज हृदय दाटले.

आईविना सारे जग अधुरे वाटत असते. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” म्हणतात ते अगदी खरेच आहे. कधी शिक्षणासाठी आई पासून दूर असेल, तर कधी काही कारणास्तव आईपासून दूर दुसऱ्या नातेवाईकाकडे रहावे लागत असेल किंवा कायमची आई आपल्याला सोडून गेली असेल. तेव्हाच त्यांना आईच्या मायेची ऊब कळत असते. तेव्हाच तिची खरी कदर होत असते. आईच्या मायेची पोकळी इतरांनी कितीही भरण्याचा प्रयत्न केला तरी ती भरू शकणार नाही.; ती रितीच राहील.

अलीकडे आम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेतो आणि दुसरीकडे स्वतःच्या आई वडीलांना वृद्धाश्रमात ठेवतोय. कुण्या अडाणी व्यक्तीच्या बाबतीत दिसतंय का हे? कधीच नाही. ते स्वतःजवळ त्यांना ठेवून त्यांची काळजी घेतात. खरे तर त्याच काळात त्यांना आपल्या अपत्याची गरज असते, आपल्या नातवंडाला खेळवायच असते, त्यांच्यातच आपलं बालपण बघायचं असतं , शेवटी ते फक्त प्रेमाचे भुकेले असतात. आम्ही नेमकं तेच टाळतोय. तरीही आईच्या प्रेमाचा निर्झर निस्वार्थ पणे वाहतच असतो. सतत प्रेमरूपी निर्झराचा पाझर पाझरतच असतो. तेच नेमक्या शब्दात माझ्या हायकू रचनेत सांगण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे. आणि खरेच नेहमी प्रमाणे अचूक परीक्षणही झाले.

“सासरी कितीही सुख असेल, नवराही खूप प्रेम करीत असेल..पण आईच्या प्रेमाची सर नाही यायची कशाला .” कुणाला किती दुःख सांगितले तरी त्यांना कळतीलच असे नाही. पण आईला आपले दुःख न सांगताही नजरेचा कटाक्ष टाकताच ती आपल्या दुःखाचा अचूक वेध घेत असते . तिला दुःख सांगण्याची गरज पडत नाही. आणि हो, .. दु:खात मन कितीही कठोर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आई समोर दिसताच नेत्रकडा अलगद ओल्या होतात, आणि कंठातून हुंदका बाहेर पडतोच. आणि मनही हलकं होतं, जणू डोक्यावरचे ओझेच आईने उचलावे.

प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर, जि. चंद्रपूर
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles