‘ब्लॅक इज ब्युटीफूल’; डॉ अनिल पावशेकर

‘ब्लॅक इज ब्युटीफूल’; डॉ अनिल पावशेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’गो’ फॉर गोरेवाडा, जंगल सफारी भाग ३_

बिबट सफारीत बिबटे दूर आरामात पहुडले असल्याने त्यांचे दूरदर्शन झाले होते. पण त्यांना जवळून बघता आले नाही याची मनात हुरहूर लागली होती. लगेच अस्वल सफारीत बस ने प्रवेश करताच दोन मोठ्या अस्वलांनी दर्शन दिले आणि बच्चेकंपनीच्या उत्साहाला उधाण आले. अर्थातच अस्वलांनी पर्यटकांना हुंगले नाही परंतु आपल्या सहजवृत्ती नुसार ते सभोवताली भक्ष्य शोधण्यासाठी जमीन हुंगण्यात व्यस्त होते. अस्वल सफारीकरीता २४ हेक्टर क्षेत्र राखीव असून याठिकाणी नैसर्गिक सवाना क्षेत्र,पर्णपती वनांची थीम साकारली आहे.

पांडा सोडून सर्व अस्वले प्रामुख्याने काळ्या किंवा तपकिरी रंगांची असतात. धृवीय अस्वलाची त्वचा देखील काळ्या रंगाची असून फक्त केसांचा रंग पांढरा असतो. भारतीय अस्वलात पांढऱ्या रंगाचे लांब मुस्कट, खालचे ओठ लांब असणे, नाकपुड्या पुढे आलेले असणे हे त्याचे वैशिष्ट्य होय‌. अस्वले पुढच्या दोन पायांच्या पंजाचा उपयोग हातासारखा करतात. अस्वलाची उंची साधारणतः ७० ते ९० सेमी, लांबी १.८ मीटर तर वजन जवळपास १२० किलोपर्यंत असू शकते. अस्वलांचे सरासरी आयुर्मान २५ ते ३० वर्षांचे असते. जगभरात अस्वलांच्या एकूण आठ प्रजाती आढळतात.

अस्वले बोजड असतात. शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात. ते त्यांचे मागील पाय पूर्णपणे टेकवून चालतात तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. अस्वलाची दृष्टी कमकुवत असल्याने बरेचदा ते धोका जाणवला किंवा हवेतील गंध हुंगण्यासाठी अथवा सभोवताली अंदाज घेण्यासाठी मागील पायांवर उभे राहतात. भक्ष्य शोधण्यासाठी ते सर्वस्वी नाकावर अवलंबून असतात कारण त्यांचे नाक खूप तीक्ष्ण असते. भारतातील तपकिरी रंगाचे अस्वल जवळपास एक ते दीड किमी अंतरावरून येणारा गंध ओळखू शकतात.

अस्वले सर्वभक्षी असले तरी त्यांना मासे खायला आवडतात. म्हणून ते नदी काठी अथवा तलावाजवळ राहतात. सोबतच मधमाशा, झाडांच्या बीया, मुळे, फळे, किडे, मुंग्या, वाळव्या इत्यादीं वर ताव मारतात. अस्वले झाडांवर सहजपणे चढू शकतात तसेच ते पाण्यात पोहू शकतात. अस्वले सहसा आवाजाने संवाद साधत नाही आणि सहसा शांत असतात. पण भुक लागली, दुसऱ्या अस्वलाने अथवा माणसाने आव्हान दिले किंवा जोडीदारासाठी स्पर्धा करतांना ते गुरगुरतात. वाळवी आणि अळ्यांच्या घरट्यावर छापा टाकून, त्यांना ओठांनी शोषून घेणे हा अस्वलांचा आवडता उद्योग होय.

या सफारीत एकूण पाच सहा अस्वले बघायला मिळाली. प्रारंभीच दर्शन देणारी दोन मोठी अस्वले, यानंतर एक आकाराने मोठे आणि धडधाकट अस्वल जमीन खोदून खड्डा करण्यात व्यस्त होते. ते बहुदा भक्ष्याच्या शोधार्थ असावे. आणखी काही अंतरावर दोन लहान आकाराची अस्वले एकमेकांशी खेळण्यात दंग होते. एका छोट्या मचाणावर चढणे, उतरणे किंवा एकदुसऱ्याला ढकलून देणे यात मस्तपैकी रमले होते. काळ्या कुळकुळीत रंगाची ही जोडी दुपारच्या उन्हात चांगली उठून दिसत होती. खरेतर त्यांचा दाट केशसंभार पाहून त्या दोघांनी काले घने बाल ची जाहिरात करायला हरकत नव्हती‌. त्यांचे एकंदरीत जंगली सौंदर्य, बालसुलभ, नैसर्गिक लीला पाहून सहजच ब्लॅक इज ब्युटीफूल असे म्हणावेसे वाटते.

दि‌. २३ मे २०२३
मो. ९८२२९३८२८७
anilpawshekar159@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles