
आले आभाळ आभाळ
आले आभाळ आभाळ
सरी येतेय धावून
अंगणात ओले वस्त्र
आता येतोय पाहून
आले आभाळ आभाळ
झाला श्रावणही सुरू
नदी नालेही तुडुंब
वाहू लागलेत भरू
रिमझिम पावसाची
सुरू झाली श्रावणात
रंगीबेरंगी फुलांची
धरा करी बरसात
उगवता सूर्य नभी
अवतरे इंद्रधनू
निळ्या आकाशी तोरण
दिसे रानावनातून
आले आभाळ आभाळ
लागे सुखाची चाहूल
मळा फुलवन्यासाठी
बळी उचले पाऊल
पडता पावसाच्या सरी
येती मृत्तीकेला गंध
आले आभाळ आभाळ
सरी वर्षतील धुंद
क्षणा क्षणाला जाणवी
खेळ ऊन पावसाचा
खेळ खेळती निसर्ग
लपंडाव आवडीचा
आले आभाळ आभाळ
धरा निघाली न्हाऊन
गुच्छ रंगीत फुलांचे
येई डोक्यात माळून
प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर
जि. चंद्रपूर