
शशांक
मंद गारव्यात सजला
सोहळा हा नभांगणी
तारका पुनवरातीच्या
शितल चांदव्यात रजनी…
मन मोहित झाले
पाहून रूप मयंकाचे
अलवार ओठांवर
सूर उमटले प्रीतीचे…
शशीसहित तारांगण
अवतरले जलाशयी
आठवांचे सचेत तरंग
टिपत सुखावली मृण्मयी…
सतजन्माची सप्तपदी
मेंदीने सजले हस्तदल
सोबतीला चंद्र माझा
हर्षले मम नयनकमल…
घेऊन हात हातामध्ये
विहार प्रीतचांदण्यात
साक्षीला रजनीकांत हा
प्रित मोहरली हृदयात…
गवाक्षातून झुळूक गार
स्पर्शली कोमलांगास
स्वप्नातील नयन जागले
गाली हसला शशांक…
आशा कोवे गेडाम
वणी जि. यवतमाळ
======