सेवानिवृत्त शिक्षकांना द्विशिक्षकी शाळेचे ओझे पुन्हा कशासाठी❓

🎯 *सेवानिवृत्त शिक्षकांना द्विशिक्षकी शाळेचे ओझे पुन्हा कशासाठी* ❓पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

————————————————-
महाराष्ट्र विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात महाराष्ट्रातील कमी शिक्षक संख्या असलेल्या शाळांना पुरेसे शिक्षक कधी उपलब्ध करुन देणार ? आणि २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण शासनाच्या विचाराधीन आहे का ? या दोन प्रश्नांवर अनेक सन्माननिय सदस्यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना बोलते करण्यात आले होते . मात्र या दोन्ही प्रश्नांबाबत आलेली उत्तरे तशी अनाकलणीय होती …… त्याचाच परिपाक म्हणून 7 जुलै रोजी निघालेला शासन आदेश !
*संपूर्ण राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीचे धोरण शासनाने अव्हेरले आहे*. अवकाळी बदल्यांचे सत्र सुरुच आहे… आता तर संपूर्ण बदली धोरणाचाच पुनर्विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे . अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत … नव्हे तर औषधालाही शिक्षक कार्यरत नाहीत. मध्यंतरीच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळलेली पावले शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे *पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊन विसावल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले होते* .परंतु पुन्हा एकदा उलटी गणती सुरु झालीय . नविन शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शून्य शिक्षकी शाळांचे भीषण वास्तव ठळकपणे पुढे येत आहे . इयत्ता ७/८ वी पर्यंतचे वर्ग एखादं दुसऱ्या शिक्षकांवर सुरु आहेत ……. *वर्ष दोन वर्षे आज ना उद्या शिक्षक येतील या भाबड्या आशेवर रोखून धरलेल्या पालकांच्या संयमाचा बांध फुटलाय* . पोटाला चिमटा घेऊ परंतु पोराबाळांना शिकवू ही भूमिका घेऊन गोरगरीब खेडूत नाईलाजाने खाजगी शाळेच्या वाटेने निघाले आहेत . कारण काय तर *महाराष्ट्रातील अनेक तालुक्याच्या टोकावरील शाळांमध्ये एकही शिक्षक कार्यरत नाही . पर्यायी व्यवस्था म्हणून त्या परिसरातील वेगवेगळ्या शाळांतील शिक्षकांची रोजवारी ठरवून दिली जाते* . एखादा शिक्षक तोंडी आदेशाने पाठविला जातो . शाळा उघडली जाते ……. पोषण आहार शिजविला जातो …..*चार वर्गांसाठी किमान समान अभ्यास देऊन दिवस पुढं ढकलला जातोय*. अनेक शाळा ओस पडल्या आहेत ….. अजूनही नव्याने त्यात भर पडत आहे . वास्तविक गेल्या १० /१२ वर्षापासून शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे प्रत्येक खेड्यात डी.एड.पदविका धारण केलेले सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत . नविन भरती होईपर्यंत तात्पुरती सोय म्हणून 7 तारखेच्या आदेशातील अटी व शर्ती घालून एप्रिल / मे महिन्यात करार केले गेले असते तर या युवकांच्या माध्यमातून प्रशासनाला एक आश्वासक वातावरण तयार करता आले असते. पण हा निर्णय म्हणजे *वराती मागून घोडे* अशातला प्रकार नव्हे काय ? शिक्षक उपलब्ध नाहीत म्हणून अनेक शाळांतून पालकांनी मुले अन्यत्र दाखल केली आहेत .त्यातून ६० ते ६५ वयोगटातील शिक्षक दाखल होणार आहेत …….आपली मुले परत बोलावून घ्या म्हणून सांगण्यासाठी पुढाकार घ्यायला कुणी धजावेल असे वाटत नाही …..आणि प्रतिसाद मिळेल याची शाश्वती नाही .
त्यातूनही पर्यवेक्षीय यंत्रणेतील केंद्रप्रमुखांपासून , गटशिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी दर्जाची अनेक पदे वर्षानुवर्षे भरली गेलेली नाहीत त्यामुळे ” *सगळा कारभार हरीवर हवाला* ” अशीच स्थिती होवून बसली आहे . आपल्याकडे ” *आजार रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला* ” अशी म्हणं आहे . 7 जुलै रोजी निघालेला आदेश देखील त्याच धाटणीतील आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना २० हजार रुपये मानधनावर नेमण्यासाठी कार्यवाही आरंभ होवू घातलेली आहे .
*वास्तविक मानवाचे सरासरी आयुर्मान , आरोग्याच्या तक्रारी , शिक्षकी पेशाला चिकटलेली कारकूनी कामे त्यातून वाढणारा ताण तणाव यामुळे वयाच्या साठीत पुन्हा एकदा सेवानिवृत्त शिक्षक बांधवांना मानधन देऊन एकदा कामावर जुंपणे किती संयुक्तिक आहे* ?
याउलट गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या बेरोजगार युवकांना ही संधी का दिली जात नाही ? *समान काम समान दाम* या मूल्याला पायदळी तुडवून आणि शिक्षक संघटनांचा विरोध पायदळी तुडवित २००० सालांपासून अल्प मानधनावर शिक्षण सेवक म्हणून प्रथा रुढ झालीय. *हेच मानधन देऊन स्थानिक पातळीवर सुशिक्षित युवकांतून सोय करणे शक्य असताना शिक्षक भरतीला हा पर्याय कशासाठी निवडला जातोय* ? इरिगेशन , मैलमजदूर तसेच आरोग्य विभागातील असंख्य पदे निवृत्त झाल्यानंतर ती पूर्णतः गोठविली गेली …… पुन्हा त्या पदांची गरज शासन व्यवस्थेला वाटली नाही . शिक्षकी पेशातील ही रिक्तपदे *तत्काळ भरती प्रक्रीया राबवून भरली जाण्याचीच निकड आहे . नव्या पिढीतील उत्साही शिक्षक नव्याने सेवेत दाखल होवून वाडी वस्तीवरील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे धडभले करु शकतील*……. योग्य वयात त्यांच्या क्रयशक्तीला वाव मिळाला पाहिजे …….. इतकेच !

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles