
पूर्ववैमनस्यातून दोघांची हत्या तर एक गंभीर जखमी
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी मध्यरात्री तलवारी कोयत्याने हल्ला
तालुका प्रतिनिधी ।पुसद :
येथील विठाळा वार्ड येथे राहणाऱ्या तरुणांनामध्ये जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दि.२० जूलै २०२३ रोजीच्या रात्री १.३० वाजताच्या दरम्यान ६ ते ८ जणांनी संगणमत करून घराचा घेराव केला.त्यानंतर तिघांवर तलवारी,कोयत्याने सपासप वार करीत तिघांना जखमी करून हल्लेखोर पसार झाले.तलवारी,कोयत्याने वार केल्याने चुलते पुतणे अशा दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री नंतर घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सहा निष्पन्न आरोपी विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये जखमीच्या चुलत पुतण्याने दिलेल्या तक्रारीवरून दि.२० जुलै २०२३ रोजीच्या सकाळी ६.३१ वाजता विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विठाळा वार्डात राहणारे राहुल हरिदास केवटे वय ३५ वर्षे व क्रिश उर्फ सुमित विलास केवटे वय २२ वर्षे या दोन्ही काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे.तर हल्ल्यात राहुल केवटे याचा सख्खा भाऊ बंटी हरिदास केवटे वय ३७ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे.बंटीच्या पाठीवर कोयत्याचे गंभीर वार झाल्याने त्याची प्रकृती देखील नाजूक असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.त्याला यवतमाळ येथे अधिक उपचाराकरिता पाठविले आहे. विठाळा वार्ड येथे राहणाऱ्या पवन बाजीराव वाळके वय २३ वर्षे, निलेश दीपक थोरात वय २४ वर्षे, गणेश संतोष तोरकड वय २१ वर्षे, गोपाल शंकर कापसे वय २६ वर्षे,गणेश शंकर कापसे वय २४ वर्षे व अवि चव्हाण वय २२ वर्षे या संशयित हल्लेखोरां विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.हल्ल्याची माहिती मिळतात अतिरिक्त एसपी पियुष जगताप यांनी घटनास्थळी सर्वात प्रथम धाव घेतली होती.
त्यानंतर एस.पी. पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला शोधण्यासाठी चारही पोलीस स्टेशनची एक टीम व डीबी एक टीम रवाना केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतकाचे नातेवाईकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय दोन्ही शव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करणार असल्याची माहिती पोलिसांना कळताच शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये कमांडो तैनात करण्यात आले होते.घरासमोर टोळकी का आणता या कारणावरून दि.१९ जूलै २०२३ रोजीच्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान गणेश तोरकड व क्रिश विलास केवटे सोबत सर्वप्रथम वाद निर्माण झाला होता.किरकोळ वादाचे रुपांतर भिषण हत्याकांडात घडल्याने परीसरात भिंतीचे वातावरण पसरले आहे.