
जय गिरनारी
जय गिरनारी जय गिरनारी
हा नाद उठे मम अंतरी
रुप तव ते दिव्य पाहण्या
ही ओढ जीवा लागे खरी
मम हृदयाची साद ऐकुनी
तू बोलाविशी मज तव द्वारी
तव कृपेने हे भारावले मन
भाव भक्तीचा दाटलासे उरी
मानून आज्ञा तव शिरसावंद्य
निघाले चढण्या तुझी पायरी
जरी भयभीत मन हे माझे
परि निष्ठा ही तव चरणावरी
तमा न मज पाऊस वाऱ्याची
मन माझे ना व्यर्थ चिंता करी
टेकविला पायरीवरी माथा
भार सारा आता तुझ्यावरी
चढण्यासाठी बळ तूच देशी
मार्ग असे किती खडतर जरी
अंतर्मना नाद तव नामाचा
पाऊले पडती त्या नादावरी
घेऊन दर्शन आई जगदंबेचे
चढलो गोरक्षनाथांची पायरी
अखंड धुनीचे दर्शन घेऊन
आलो अखेर गुरुशिखरावरी
दिव्य पादुकांचे घेता दर्शन
लोटांगण घातले चरणावरी
नयनांश्रुंचा करुनी अभिषेक
गुरुरुप साठविले हृदयांतरी
वंदीता त्या गिरी नारायणा
दूर झाला क्षीण पळभरी
आशिर्वचन ते घेऊन गुरुंचे
निघालो प्रसन्न चित्ताने घरी
अर्चना सरोदे
सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव