लेक लाडकी’, दमलेल्या बाबासाठी विसावा क्षणाचा.’;स्वाती मराडे

लेक लाडकी’, दमलेल्या बाबासाठी विसावा क्षणाचा.’;स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुरूवारीय चित्र चारोळी काव्यस्पर्धेचे परीक्षण

तू हळवा कोपरा मनाचा, दमलेल्या बाबासाठी तू विसावा क्षणाचा… तू म्हणजे घराचं हसतंखेळतं घरपण.. तुजवीण भासे हे घर-अंगण सुनंसुनं.. तुझं इवलं पाऊल म्हणजे आनंदाची चाहूल, रूंजी घालते कानात तुझ्या पैंजणाची रूणझुण.. तू म्हणजे दैवानं दिलेलं दान भरभरून.. तू म्हणजे सुखाचा सागर.. तू आहेस मायेचं आगर.. तू निर्मळ आनंद, तू मन प्रसन्न करणारा केवड्याचा गंध.. मजसाठी तू नाहीस भार तू आहेस आधार.. तू शितल चांदणं.. तू आपुलकीचं गोंदण नि मायेचं कोंदण‌.‌ तू उत्साहाचा झरा..तू गारवा देणारा मंद वारा.. तू विसर सा-या दु:खांचा.. तू पाऊस आहेस सुखाचा.. अन् तू म्हणजे हे शब्दांचं सगळं आभाळ सामावणारा एक इवला शब्द..’लेक’… लाडकी ‘लेक’..!

हृदयकुपीतील तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही. कधी तू हक्क गाजवतेस तर कधी हट्ट करतेस. पण तुझा हट्ट केवळ नसतो तुझ्यासाठी तो असतो माझ्यासाठीही.. मला जपण्यासाठी, माझ्या काळजीपोटी.. रखुमाईसारखे कमरेवर दोन हात ठेवून जेव्हा तू बोलतेस ना तेव्हा वाटते तू फक्त नाहीस गं केवळ माझं बाळ.. तू तर आहेस आईसारखं जीव लावणारं मायेचं आभाळ..! तो इवला जीव पहिल्यांदा हातात घेतल्यानंतर मनात जे आनंदाचे भरते येते त्याची तुलना केवळ स्वर्गसुखाशीच होऊ शकते. तो जीव मग काळजाचा तुकडा होतो.

स्वतः फाटका असला, तरी लाडकी लेक एखाद्या राजकुमारीसारखी सांभाळण्यासाठी बापाची धडपड चालते. स्वतःची कामेही स्वतः न करणारा तो मात्र लेकीचे काम आवर्जून करतो. तिला आत्मबळावर उभे करण्यासाठीही कंबर कसतो. योग्य शिक्षण मिळावे म्हणून काळजी घेतो‌. तिचं भविष्य घडविण्यासाठी वर्तमानात सजग राहतो नि ती सासरी जाताना हळवा होऊन गहिवरतो. आजवरच्या त्याच्या जीवनातील स्त्रियांपैकी त्याला अंतर्बाह्य बदलणारी ती म्हणजे ‘लेक लाडकी.’

आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र.. लेकीला शाळेत जाण्यासाठी तयार करणा-या अडाणी वाटणा-या बापाचे. माझ्या वाट्याला आलेले दु:ख तिच्या वाट्याला कधीही न येवो सतत तिची ओंजळ सुखक्षणांनी भरून राहो हीच त्याची इच्छा डोळ्यातून दिसते. बाप कसाही असला तरी लेक ही त्याची जीव की प्राण असते हे दर्शविणारे. आज रचना लिहिताना सर्वांनीच लेकीसाठीचा हा हळवा कप्पा रिता केला नि विविधरंगी रचना साकारल्या. असेच लिहीत रहा या सदिच्छेसह सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन! आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार. ..!!

स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक, सहप्रशासक,कवयित्री लेखिका
मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles