संगम
उगम सोडून मागे, मी नित्य पुढेच वाहतेय
सागर संगमी आतूर मी, अविरत धावतेय.. //
कधी शांत संथ मी, कधी उतावीळ होतेय
माझ्याच मस्तीत मस्त , मिलन गित गातेय… //
मनमित अजून दूर किती, हूरहूर दाटतेय
साहवेना मज दुरावा, अंतर फार वाटतेय.. //
कधी वळण धोक्याचे,मी नागमोडी घेतेय
आडवाट जंगल घाट, ते गाव कधी येतेय.. //
किती घोर बंधने, तुझ्यासाठी पार करतेय
ओढ म्हणू वेड कळेना, हिम्मत ना हरतेय… //
गाज तुझ्या लाटांची, कानी माझ्या गुंजतेय
हाक तुझ्या प्रेमाची, खुणगाठ मनी बांधतेय..//
समिप येताक्षणी तुझ्या, लाजेने मी बावरतेय
कुशित तुझ्या शिरताना, अंग अंग शहारतेय.. //
तुझ्या रूपी एकरूप, ना माझे काही उरतेय
काया,वाचा, मने, सर्व समर्पण अनुभवतेय.. //
विष्णू संकपाळ, बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
==============