Home ताज्या घटना ग्रामीण तरुणांच्या वाटेला बेरोजगारीच

ग्रामीण तरुणांच्या वाटेला बेरोजगारीच

70

ग्रामीण तरुणांच्या वाटेला बेरोजगारीच



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संदीप नंदनवार, पालांदूर

“शेकडो वेळा चंद्र आला,
तारे फुलले, रात्र धुंद झाली,
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली”
या नारायण सुर्वे यांच्या कवितेतील ओळी आता तरुण बेरोजगारांच्या ओठी येत आहेत.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक घरातील कर्त्या व्यक्ती गेल्या. अनेकांच्या नोकऱ्या व व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. महागाई प्रचंड वाढली शेकडो तरुण बेरोजगार झाले. या ग्रामीण भागातील तरुणांची चांगलीच ससेहोलपट होताना दिसून येत आहे. ना नोकरी, ना शेतमालाला दर, ना व्यवसायात यश यामुळे तरुण संघर्ष करून जीवन जगत आहे. जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारची काय प्रतिमा आणि काय योजना आहेत याबाबत तरुण अनभिज्ञ असून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होताना दिसत आहे.
ग्रामीण भागात पूर्वी शेतात खूप कामे होती. महिलांनाही दररोज रोजगार उपलब्ध होता. मात्र, शेतीवर औषध फवारणी होऊ लागल्याने महिलांचे शेतातील मजूरीचे काम बंद झाले. पेट्रोल-डिझेल दर वाढल्याने त्यावर अवलंबून असलेले छोटे व्यावसायिक अडचणीत आले. तर काहींनी कर्ज काढून घेतलेले वाहने विकून टाकणे पसंत केले. लाखनी तालुक्यातील ग्रामीण भागात छोटे-मोठे उद्योगधंदे नसल्याने पडेल ते आणि पडेल त्या मोबदल्यात अनेक उच्चशिक्षित तरुण काम करताना दिसत आहेत.
रासायनिक खतामुळे शेतातील उत्पन्न घटले. पर्यायाने आर्थिक चणचण जाणवू लागली. महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा आणि बेरोजगारी हे सर्वात मोठे अपयशाचे मुद्दे ठरत असून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
थकित वीज बिलांमुळे शेतकऱ्यांच्या वीज पंपाचा वीजपुरवठा तोडला जात आहे. यातून त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. पर्यायाने पाणी असूनही पिके जळून जात आहेत.
अनेक सरकारी, सहकारी खाजगी कार्यालयात, विविध प्रकारच्या कार्यालयात, रुग्णालये, शाळा महाविद्यालये या ठिकाणी होणारी नोकरभरती बंद असल्यामुळे अनेक तरुणांना पात्रता असूनही संधी मिळत नाही.
कोरोना काळात महागाईचा दर सातत्याने वाढताना दिसला. आजही तो वाढतच आहे. दहा रुपयांच्या वस्तूसाठी पन्नास रुपये घेऊन जायची वेळ आली. पेट्रोल पासून खाद्यपदार्थ पर्यंत सगळ्या बाबी महाग होत आहेत. दुसरीकडे पात्रता असून, काम करण्याची इच्छा असूनही ग्रामीण तरुणांच्या वाट्याला बेरोजगारी आली आहे.

*कामधंदा नसल्यामुळे तरुण गुन्हेगारीकडे आणि व्यसनाधीन*

ग्रामीण भागात तरुणांकडे कोणताही व्यवसाय उपलब्ध नसल्यामुळे तरुण व्यसनाधिन होत असून त्यांची वाटचाल गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पहावयास मिळत आहे.

“कृषीपंप, पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची वीज कापणार असे मा. ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणत आहेत. म्हणजे सरकारला शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करुन फक्त स्वतःची तिजोरी कशी भरायची हे चांगले माहित आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई मनपाची निवडणुक लक्षात घेता विदेशी दारुवरील आयात शुल्कात कपात केली. पण ज्या शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करतात त्यांच्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही. शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही, पन्नास हजार रुपये अनुदान व वीज बिल माफ ही सरकारची पोकळ घोषणा ठरली आहे.”

*धनराज नंदूरकर, शेतकरी, पालांदूर.*

” ग्रामीण भागात उद्योगधंद्यांची वाणवा आहे. कोरोनामुळे तरुण बेरोजगार झाले असून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी उपाययोजना सरकारने अंमलात आणावी. जेणेकरुन ग्रामीण भागातील तरुण वाममार्गाकडे जाणार नाही.”

*पंकज रामटेके, सरपंच, ग्रा.पं. पालांदूर.*