
सांगलीत राष्ट्रवादीचा विस्तारवाद
मित्र पक्षांची अवस्था ‘ सांगताही येईना आणि सहनही होईना ‘
सांगली :- सांगली जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आजही जिल्ह्यात कॉंग्रेसची ताकद आहे. मात्र, पक्ष गटा-गटात विभागला असल्याने याचा फायदा राष्ट्रवादीच्या (NCP) विस्तारवादी भूमिकेला मिळत आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सत्तेत आहे. सत्तेच्या सारीपाटावर जरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (Shiv Sena) हे तीन मित्रपक्ष एकत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात मतदारसंघ पातळीवर मात्र या तीन पक्षांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचे दिसत आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यात तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेला नामोहरम करत संपूर्णत: आपले वर्चस्व राहील याची व्यूहरचना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारवादी भूमिकेमुळे मित्र पक्षांची अवस्था सांगताही येईना आणि सहनही होईना अशी झाली आहे.
सांगलीचे पालकमंत्री असलेल्या जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून जिल्ह्यात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही आपला स्वत:चा गट याचा कसा विस्तार होईल या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली. जिथे नेतृत्व नाही तिथे नेतृत्व तयार करत त्यांना पुढे आणण्याची पद्धतशीर मोहीम सुरु केली आहे. ज्या मतदारसंघात कॉंग्रेस व शिवसेनेचे आमदार आहेत त्या ठिकाणी सुद्धा पर्यायी नेतृत्व उभे करण्याचे काम सुरु आहे.
राज्यातील सत्ता हाती येताच सांगली बाजार समितीचे अख्खे संचालक मंडळ जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये आणले. या बदल्यात या संचालक मंडळाला दोन वेळा अतिरिक्त मुदतवाढ दिली. याचबरोबर सांगली महानगरपालिकेत महापौर निवडीच्यावेळी भाजपच्या तंबूतील काही सदस्य बाहेर काढण्यात यश आल्याने सत्तांतर घडवून आणण्यात राष्ट्रवादीला यश आले. मात्र, सदस्य संख्या जास्त असूनही काँग्रेसला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागले. काँग्रेसअंतर्गत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील, मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि कदम असे तीन गट असल्याने या गटविभाजनाचा नेमका राजकीय लाभ राष्ट्रवादी सातत्याने घेत आली आहे.
एकंदरीत राज्यातील सत्तेत जरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस असे तीन पक्ष मित्र म्हणून दिसत असले, तरी प्रत्यक्षात सांगली जिल्ह्यातील मतदारसंघ पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे विस्तारवादासाठी पुढे सरसावली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांत एकीऐवजी बेकी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.