
बाहुबली चित्रपटातील कटप्पासारखा ठाकरेंचा रोल – अपक्ष आमदाराची टीका
अमरावती :- २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नावावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मते मागितली. बाहुबली चित्रपटात कटप्पाने जसे बाहुबलीच्या पाठीत खंजीर खुपसले तसेच ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पाठीत खंजीर खुपसले, या शब्दात रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. जे छत्रपतींचे झाले नाही ते महाराष्ट्राचे कसे होणार, असा निशाना साधत मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना धोका दिला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राणा दाम्पत्य 36 दिवसांनी चौदा दिवसाच्या तुरुंगवासानंतर विदर्भात दाखल झाले. त्यांचे अमरावतीत आगमन होताच ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण करत जंगी स्वागत केले. गंगा सावित्री निवास्थानी राणा दाम्पत्य पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांचा दुग्धभिषेकही करण्यात आला. जनसामान्यांच्या समस्या सोडविताना एक नवा संकल्प करून पुढील वाटचाल करणार असल्याचे राणा दाम्पत्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कटप्पा सारखा रोल असल्याची टीका करत आ. रवी राणा (Ravi Rana) यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राणा दाम्पत्यावर 341,135,291,143 हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व गुन्हे बेलेबल असल्याची माहिती देत पोलिसांच्या नोटीस नंतर जामिनाची प्रक्रिया सुरू करू असे राणा यांचे वकील ॲड. दीपक मिश्रा यांनी सांगितले आहे.