
राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न येतो कुठे?; गृहमंत्री
_उद्धव ठाकरेच पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्री असतील_
मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बदलाबाबत महाविकास आघाडीत सध्या कोणतीही चर्चा नाही आणि मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न येतो कुठे? असे स्पष्टीकरण आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे, असे विधान केले होते. त्यावर वळले-पाटलांनी हे वक्तव्य केले आहे.
*कोणतीही चर्चा नाही*
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हाच उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्व करतील हे ठरले होते. याबाबत नंतर महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे यापुढील कार्यकाळात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपद भूषवतील.
*बनावट नोटांचे आव्हान*
केंद्रातील मोदी सरकारला नुकतेच 8 वर्षे पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्राच्या विविध योजनांचा व मोदींच्या महत्त्वाच्या निर्णयांचा प्रचार केला जात आहे. यावर दिलीप वळसे पाटील यांनी टीका केली. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देशात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन काय साध्य केले?, असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीच्या चुकीच्या धोरणामुळे देशात सध्या बनावट नोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे बनावट नोटांना रोखण्यासाठी केंद्राने ठोस उपाययोजना राबवायला हव्यात, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. नोटाबंदीचे धोरण नेमके कुठे फसले याचीही केंद्राने चौकशी करायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला.
*सर्वांनी मर्यादा पाळाव्यात*
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही त्यांना घरी जाऊन बदडण्याची भाषा केली आहे. यावर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावी. अन्यथा दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला.