जेव्हा अश्रूंनी…बोलतात मुकी फुले..!

जेव्हा अश्रूंनी…बोलतात मुकी फुले..!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️सविता पाटील ठाकरे, सिलवासा

कसे दिलेत गजरे?….माझा नेहमीचाच हा प्रश्न गजरेवालीनं हसत हसत झेलला…अंगाची लाही लाही करणारं ऊन…तिच्या आजूबाजूला तिच्या चिल्यापिलांचा पसारा…कुणी रांगतय..कुणी मातीत खेळतयं..तर कुणी त्या चिमुरड्या हातानं तिचा भार हलका करायचा प्रयत्न करतयं..घामाच्या धारांनी निथंबलेलं तिचं ते शरीर..पण चेहऱ्यावरचे भाव मात्र प्रसन्नच…मला उत्तर न देता सरळच सरावानं तिनं तीन गजरे बांधलेत अन् हातावर देत म्हणाली…ताई तुमच्याकडून कधीच जास्त पैसे नाही हो घेणार…द्या वीस रूपये…वीस रूपयाची नोट तिच्या हातात देत ऊन्हापासून स्वतःचा बचाव करत पटकन निघाली…निघतांना तिच्या त्या पिलाचे माझ्याकडे झेपावलेले हात पाहून मी निर्विकार झाले.

घरी पोहचली….पण मन?…मन मात्र सारखं त्या गज-यावालीभोवतीच फिरत होते…किती सराईतपणे सुईदोऱ्याचा वापर न करता गजरे मळतांना फुले एकमेकांत अडकवली जात होती….क्षणभर विचार केला..त्या एका धाग्यात सारं काही गुंफलं जातं…मग आम्ही मानव??…का बरे गुंफले जात नसू माणूसकीच्या धाग्यानं?…त्या कळ्या खरं तर त्यांना फुलायचं होतं..आपला जीवनप्रवास अर्ध्यावर सोडूनच त्या निघाल्यात कुणाच्यातरी केसांची शोभा वाढवायला…अन् आम्ही मात्र सारं काही असूनसुध्दा जे नसेल त्याच्या शोधात सारी जिंदगी बरबाद करतो…त्या बिचाऱ्या कळ्या सतत देतात सुगंध..अन् आम्ही विनाकारण पसरवतोय वैचारिक दुर्गंध…विचारांच्या चक्रात कधी मी श्यामच्या आईकडे पोहचली कळलेही नाही…’श्याम मुक्या कळ्या तोडू नयेत कधी’ या वाक्याने मी अंतर्मुख झाले…वाटलं अश्रूंची वाणी समजायला पापण्या भिजल्याच पाहिजे असे नाही. मुकी फुले अश्रूंनी बोलतांना मी ऐकेले….माझ्या अंतर्मनातून…!

‘मुकी फुले’….ती बिचारी झाडावरच राहून गेलेली… सखेसोबती कुठल्यातरी देव्हा-यात..अन् ही बिचारी अबोल म्हणून तिथेच राहीलेली….कसे जीवन जगतात ना ही फुले?…कधी कळी होऊन.. न उमलताच गज-यात जाऊन बसणं..कधी कुणाच्यातरी हारतुऱ्यांमध्ये दिमाखात स्वतंला मिरवणं..कधी कुणाच्यातरी सरणावरील शोभा बनून स्वतःलाही जाळून घेणं,..मुकीच ना ती बिचारी..कुठे वेळ आहे त्यांना भावभावनांच्या खेळात रमण्याची,..कित्येकदा झाडावरचं आयुष्य झाडावरच संपतं तर कधी मातीत पडून माती बनतात..पण सुगंध देण्याचं कार्य थांबलय का कधी?…कधीच नाही..

त्या गजरेवालीची मुलं म्हणजे..देवाघरची फुले.पण ती मुकी फुले प्राप्त परिस्थितीचा सामना करण्याचे बाळकडू जणू लहानपणीच पिलेले…ना तक्रार..ना मागणं…ना रूसवा..ना फुगवा..त्या मुक्या फुलांच्या वेदनेनं माझं मन सारखं पिळवटलं जात होतं..आज अनेकार्थी मुकी फुले बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत विविधांगानं सजवलीत…सजलीही पण काहींना गंध होता तर काहींना आनंदी सुवास तर काही अश्रूगंधित

*हिरमुसला शृंगार माझा*
*गज-यात झाली मुकी फुले*
*होऊनीया मन सैरभैर हे*
*दुःखाचा हिंदोळा झुले*

फुलांची विविध रूपे मग ती अंतरीची असोत.. बोलणारी.. प्रेमाची.. कर्तृत्वाची की हसणारी…काव्य व चारोळीतून छान सजवलीत..कुणी मुलांना मुकी फुले म्हटले तर कुणी प्रेमाला…तुम्हा सर्व कवी कवयित्रींच्या सर्जनशीलतेला त्रिवार वंदन🙏🙏 व अभिनंदनीय शुभेच्छा…!!

पण थोडे काही…. आपल्या कवितेत मुक्तपणा हवा…. कविता म्हणजे जड शब्दांचा डोलारा न बनता साध्या शब्दांची मोडतोड हवी…कवितेतून आत्मस्वर मांडा…तिला मुक्त होऊ द्या…कविता बोलली तर साहित्यात अजरामर होई ल. आपण सर्वच साहित्यपूजक होण्याचा प्रयत्न करू या. ‘जगणं म्हणजे कविता’ हे ब्रीद मनात ठेवून संख्यात्मक गोळाबेरजेपेक्षा गुणात्मक दर्जेदार काव्यनिर्मिती करा…तुमच्या उत्तम साहित्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठीचे शिलेदार समूह नेहमीच बांधील राहील या..शाश्वत सत्याच्या ग्वाहीने विराम घेते…!!

सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ कवयित्री/ लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles