
खरीप हंगामासाठी हमीभावाला मोदी सरकारची मंजुरी
नवी दिल्ली: मोदी सरकारने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांना खूषखबर दिली आहे. २०२२-२३ च्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या (धान) व इतर काही पिकांच्या किमान हमीभावाला मंत्रिमंडळाच्या व मंत्रिमंडळ आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सध्या तांदळासाठी सरकार प्रती क्विंटल १९४० रूपये एमएसपी देते. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला. तांदळाबरोबरच अन्य कोणत्या पिकांच्या हमीभावाला आज मंत्रिमंडलाने मंजूरी दिली याचा तपशील लवकरच समजेल. दरम्यान, खरीपासाठीच नव्हे तर आगामी रबी हंगामासाठीही देशात खते व कीटकनाशकांचा पुरेसा साठा देशाकडे आहे, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
देशाकडे डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) व युरिया खतांचा पुरेसा साठा आहे व किमान डिसेंबरपर्यंत युरियाची आयात करण्याची गरज लागणार नाही असे सांगून मांडविया म्हणाले ”केंद्र सरकारने याआधीच १६ लाख टन युरीयाची आयात केली आहे. आगामी ४५ दिवसात राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना त्यांची मागणी व गरजांनुसार युरीयाचा पुरवठा करण्यात येईल. आतांतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतींत घसरण झाली असून पुढच्या ६ महिन्यांत खतांचे दर आणखी खाली येतील” असाही विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला.
मंत्रालयाच्या माहितीनुसार राज्य सरकारांकडे सध्या ७० लाख टन युरियाचा साठा आहे. १६ लाख टन युरीया भारताने आयात केले असून डिसेंबर २०२२ पर्यंत १७५ लाख टन युरियाचे उत्पादन होईल यासाठी सरकारची सज्जता आहे. बरौनी व सिंदरी येथील युरिया प्रकल्पांत २ नवीन संयंत्रे बसविल्याने ऑक्टोबरपर्यंत ६ लाख टन अतिरिक्त युरिया उत्पादनाला सुरवात होऊ शकणार आहे.