
‘वडाची फांदी तोडा, ५ हजार रू दंड भरा’; सोबत १ वर्षापर्यंत तुरुंगवासही
_मुंबई महापालिकेचा नवा फतवा_
मुंबई- महाराष्ट्रात येत्या १४ जून रोजी साजरा होणा-या ‘वटपौर्णिमा’ सणासाठी वडाच्या झाडाची साधी छोटी फांदी जरी अनधिकृतपणे कोणी तोडली तर त्याला किमान १ ते ५ हजार रुपये दंड तसेच किमान १ आठवडा ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने वृक्षतोड करणाऱ्या नागरिकांना दिला आहे.
वास्तविक, अनधिकृतरित्या कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करणे हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी दंड आणि कारावासाची कायद्यात तरतूद आहे. येत्या वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर वडाच्या झाडाच्या फांद्या अथवा झाड तोडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अनधिकृत वृक्षतोड केल्याचे आढळल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ (दिनांक १ जानेवारी २०१६ पर्यंत सुधारित) च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
प्रत्येकवर्षी ‘वटपौर्णिमा’ सणाच्या वेळी वडाच्या झाडाच्या फांद्या बाजारात विक्रीसाठी दिसतात. ‘वटपौर्णिमा’ सणाचे औचित्य साधून विक्रेते सार्वजनिक रस्त्यांच्या आजूबाजूची व खासगी आवारातील वडाचे झाड/फांद्या तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दि १४ जून २०२२ रोजी साजरा होणा-या ‘वटपौर्णिमा’ सणाकरिता कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होऊ नये, याकरिता सतर्क राहण्याचे आदेश सर्व उप उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. अनधिकृत वृक्षतोड करताना आढळल्यास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ (१ जानेवारी २०१६ पर्यंत सुधारित) च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.