
खेळाडूंनी ऑलिंम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न पाहावे; नरेश शेळके
_ऑलिंम्पिक स्पर्धांचे व्यवस्थापन विषयावर व्याख्यान उत्साहात_
सतीश भालेराव, नागपूर
नागपूर:- ऑलिंम्पिक आणि फिफा वर्ल्डकप या स्पर्धांचा थरार खेळाडूंसह इतरांनी देखील एकदा तरी अनुभवावा, तिथला अनुभव हा अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन क्रीडा सांख्यिकी तज्ज्ञ नरेश शेळके यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, व्यवसाय व्यवस्थापन विभाग तसेच नागपूर जिल्हा ऑलिंम्पिक संघटनेच्या वतीने जागतिक ऑलिंम्पिक दिवसानिमित्त ‘ऑलिंम्पिक स्पर्धांचे व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन विद्यापीठ क्रीडा परिसरातील व्यवसाय व्यवस्थापन विभागाच्या सभागृहात करण्यात आले होते त्यात शेळके प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दातारकर यांनी भुषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आत्माराम पांडे यांच्यासह विद्यापीठाचे क्रीडा व शारी. शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना नरेश शेळके म्हणाले, आँलिंम्पिक केवळ क्रीडा स्पर्धा नव्हे तर संपूर्ण व्यवस्थापन आहे. ऑलिंम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी स्थळाची निवड पासून ते संपूर्ण स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी करता येईल याचे नियोजन आठ ते दहा वर्षाआधीपासूनच आयओसी अर्थात इंटरनॅशनल ऑलिंम्पिक कमिटी करीत असते.
संपूर्ण स्पर्धेचे आयोजन, खेळासाठी लागणारी मैदाने तयार करणे, खेळाडूंची संपूर्ण व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, या स्पर्धांसाठी लागणारी संसाधनांचा पुनर्वापर कसा करायचा याचे नियोजनही आधीच केले जाते. सुामरे ३० हजार कोटीच्या घरात या स्पर्धेसाठी खर्च लागतो, त्यामुळे आयओसी याची जुळवाजुळव कशी करते याबाबत त्यांनी माहिती दिली. ऑलिंम्पिकमध्ये जाण्यासाठी खेळाडूंनी काय तयारी केली पाहिजे, त्याच्या कोणत्या पायऱ्या याबाबत माहिती देत खेळाडूंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.
खेळाडू म्हणून ऑलिंम्पिकमध्ये कसे सहभागी होता येईल यादृष्टीने खेळाडूंनी प्रयत्न करायला हवे. चांगले स्वप्न बघा, वयाचे बंधन आपोआप नाहिसे होईल. खेळाडूंनी मेहनत करुन आपला रेकॉर्ड सेट करावा असे आवाहन अध्यक्षीय भाषणात डॉ. दातारकर यांनी केले. प्रास्ताविकातून डॉ. सूर्यवंशी यांनी नागपूर विद्यापीठाचा किमान एक तरी खेळाडू येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावे हेच क्रीडा विभागाचा उद्देश असल्याचे सांगितले. खेळाडूंनी केवळ मेहनत करावी असे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले. प्रा. आत्माराम पांडे यांनी यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संचालन सायली वाघमारे यांनी तर आभार डॉ. आदित्य सोनी यांनी मानले. याप्रसंगी अर्चना कोट्टेवार, डॉ. मनोज आंबटकर, डॉ. हिरालाल कटरे, डॉ. श्रीराम आगलावे, प्राचार्य डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. प्रमोद नेती, डॉ. राहुल रोडे, विद्यापीठ प्रशिक्षण केंद्राचे युगबहादूर छेत्री, विजय घिचारे, पल्लवी खंडाळे आदी उपस्थित होते.