Home ताज्या घटना शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये होणार बंडाळी?

शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये होणार बंडाळी?

53

शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये होणार बंडाळी?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सात आमदारांवर पक्ष कारवाईची शक्यता_

मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय उलथापालथ झाली आहे. तर शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये असणारी धुसपूस दिसून येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या सात आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे. शिवसेने पाठोपाठ आता काँग्रेसमध्येही अंतर्गत विरोधी आवाज येऊ लागले आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला, चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसची काही मतं फुटल्याचं स्पष्ट झालं होतं. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे ही मागणी केली आहे. एका दलित उमेदरावाचा पराभव ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनेक आमदारांची सभागृहात अनुपस्थिती हे देखील योग्य नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमधून चंद्रकांत हंडोरे हे पहिल्या पसंतीचे उमेदवार तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते. चंद्रकात हंडोरे यांना एक दलित चेहरा म्हणून काँग्रेसने पुढं आणलं होतं. पण त्यांना पहिल्या पसंतीची मतंही मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. सुरुवातीला काँग्रेसची केवळ तीन मतं फुटली असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आता सात मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. फुटलेले आमदार कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे, ही बाब गंभीर असून याची दखल घेतली पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.