
महाराष्ट्राच्या विकासात केंद्राचा सिंहाचा वाटा, म्हणून पंतप्रधांनांची भेट
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. सरकार स्थापनानंतर वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिल्लीला आलो आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री रामनाथ सिंह आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांची आतापर्यंत भेट घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचेही, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी दिल्लीला आलो आहोत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, २०१९ मध्ये भाजपा शिवसेना युती होती. पण सत्तेसाठी नैसर्गिक युती तुटली. त्यांनतर आता शिवसेना आणि भाजपाची सत्ता आली आहे. लोकांना जी सत्ता हवी होती ती सत्ता राज्यात आली आहे. सर्वसामान्य लोकांचं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. जे लोकांच्या मनात होत ते आता सत्यात उतरले आहे. आमचं सरकार लोकांचा विकास करणार आहे. शेतकरी, कष्टकरींना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक राज्याचा विकास झाला पाहिजे आणि यात केंद्र सरकारचा सिंहाचा वाटा असतो. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
सरकार स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आशीर्वाद लाभले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री होते. त्यांनी सत्तेत असताना अनेक मोठे प्रकल्प सुरु केले. त्यामुळे पुन्हा समृद्धी महामार्ग आणि मेट्रो प्रकल्प वेगाने पुढे नेणार आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आम्ही उठाव केला त्याची देशात नाही तर संपूर्ण जगात नोंद झाली आहे, त्यामुळे सरकारमध्ये आमची जबाबदारी वाढलीय. हे सरकार स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान असल्याचे शिंदे म्हणाले.