
“ग्रहण शक्ती विकसित करून यशाचे मानकरी व्हा”; डॉ. विकास महात्मे
नागपूर: आशादीप अपंग महिला बाल विकास संस्थेच्या वतीने 29 वा वर्धापन दिन सोहळा खासदार पद्मश्री विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत 16 जुलै रोजी, भगिनी मंडळ सीताबर्डी येथे संपन्न झाला. याप्रसंगी स्व. उषा संत पुरस्कार, पोलिओ बाधित दंत तिरंदाज अभिषेक ठावरे यांना प्रदान करण्यात आला. अभिषेक ठावरे यांनी आपल्या मनोगतात दिव्यांगांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग प्रशस्त करायला हवा. असे प्रतिपादन केले.
शालांत परीक्षेत “मूकबधिर” गटात प्रथम आलेल्या किरण राठोड हिला स्व. वसंत मोघे पुरस्कार देण्यात आला. आणि “दृष्टीबाधित ” गटात प्रथम येणाऱ्या राजाराम यदुवंशी यास स्व.वासंती मोघे पुरस्कार देण्यात आला. लहान वयात राष्ट्रीय पॅराजलतरण स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या दृष्टीहीन ईश्वरी पांडेचां विशेष सत्कार करण्यात आला. डॉ.विकास महात्मेनी सर्व गुणवंतांचे यावेळी अभिनंदन केले आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी अभ्यासा सोबतच इतर गुणही विकसित करणे आवश्यक आहे असे सांगितले. ‘ना उमेद न होता यशाची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी कष्ट घ्या असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
दीप प्रज्वलना नंतर अंध विद्यालयातील चमूने निर्धार गीत सादर केले. आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी पुढील योजनांची माहिती दिली. संस्थेच्या सचिव अपर्णा कुलकर्णी यांनी अहवाल सादर केला. अध्यक्षीय भाषणात लालासाहेब पाटील यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून सर्वांना शुभेच्छा देत गुणवंतांचे अभिनंदन केलेत. दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार डॉ. विकास महात्मे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंतांच्या यादीचे वाचन सुप्रिया केकतपुरे यांनी केले. गुणवंतांच्या भेट वस्तूंचे प्रायोजक भारतीय जैन संघटना नागपूर, सेंट्रल महिला शाखा नागपूर तर खाऊ शारदा महिला मंडळ शंकरनगर नागपूर यांनी प्रायोजित केलेला होता.
कार्यक्रमाचे संचालन आणि पाहुण्यांचा परिचय डॉ.अनघा नासेरी यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉक्टर वृंदा जोगळेकर यांनी केले आभार प्रदर्शन अपर्णा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास डॉ. प्रकाश देव, डॉ. सुनिता महात्मे, श्रीमती अरुंधती महाजन, किरण गोखले आणि भारतीय जैन संघटना नागपूरचे सदस्य यांची विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक, आशादीपचे सदस्य आणि अनेक समाजसेवी संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.