
तरोडी खुर्द व बिडगाव ग्रामपंचायत मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करा: महिला सेनेची मागणी
नागपूर: तरोडी खुर्द व बिडगाव ग्रामपंचायत हे दोन्ही मुख्य रस्ते धोक्याचे झाले आहे. या दोन्ही मुख्य रस्त्यांची इतकी वाईट दुर्दशा झालेली आहे की वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
रस्त्यावर खड्डे पडले आहेत की संपूर्ण रस्ताच उखडला आहे काहीच कळत नाहीये. तरोडीत एकमेव शाळा असल्याने त्या दुर्दशा झालेल्या रस्त्यावरुनच विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.
एकमेव मुख्य रस्ता व दुसरा कुठलाही मार्ग नसल्याने पालक आपल्या मुलांना काळजावर दगड ठेवून शाळेत पाठवत आहेत. अणि येताना आपली मुलं सुखरूप घरी येतील ना? असा गंभीर प्रश्न पालकांना पडलाय.
मुख्य रस्ता कसा असावा हे नागरिकांनी प्रशासन विभागाला सांगणे हे अत्यंत लज्जास्पद बाब आहे ! रस्त्याची रुंदी कमी असल्याने व आजुबाजुला खोल नाली असल्याने अवजड वाहने आल्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते.
मग या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे एखादा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न महिला सेनेतर्फे उपस्थित केला गेला. जर इतर वेळीच या रस्त्याचे असे हाल आहेत तर पावसाळ्यात काय हाल असेल हे सांगण्याची गरज नाही !
ह्या रस्त्यांमुळे होणारे नागरिकांचे हाल पाहता महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे महिला राज्य सरचिटणीस रिटाताई गुप्ता व राज्य सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हाध्यक्षा सौ.कल्पना चौहान यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.फुटाणे साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की, तरोडी खुर्द व बिडगाव ग्रामपंचायत कडे जाणारा मार्ग हे दोन्ही मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करण्यात यावे. यावेळी त्यांनी तत्काळ पहाणी करून कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यावेळी दक्षिण वि. उपाध्यक्ष सौ.स्नेहा खोब्रागडे उपस्थित होत्या.