
शिव शक्ती – भीम शक्ती एकत्र; सुषमा अंधारेंनी बांधले शिवबंधन
_शिवसेनेला मिळाला आंबेडकरी चळवळीचा नवा चेहरा_
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख सध्या अडचणीत असून, गळती थांबण्याचं दिसत नाहीये. मात्र त्यातच आता शिवसेनेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देशातील लोकशाही वाचवणं गरजेचं असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.सुषमा अंधारेंच्या हातात शिवबंधन बांधल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, लढाई भरात असताना सैनिक आले आहेत. लढाई सुरू असताना जे सोबत असतात त्यांना महत्व असतं. नीलमताई यासुद्धा कडवट हिंदुत्ववादी नव्हत्या आणि त्या एकदा भेटायला आल्या. हिंदुत्वावर खूप चर्चा झाली आणि मग त्यांनी ठरवलं कि, शिवसेनेत प्रवेश करायचा. फक्त पूजा अर्चा एवढंच हिंदुत्व आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, यावेळी ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन जर इथं संविधानिक लोकशाहीची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशावेळी भाजपविरोधात निकरानं झुंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही धर्मनिरपेक्षतावादी लोकांनी असलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असं अंधारे यावेळी म्हणाल्या. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिव शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे.