
चेंढरे ग्रामपंचायत सभागृहात सेंद्रिय पोषण परसबाग विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सचिन पाटील (अलिबाग)
रायगड: एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अलिबाग, सहाय्यक ट्रस्ट मुंबई तसेच प्रेरणा सामाजिक विकास संस्था महाड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत चेंढरे येथील स्वर्गीय प्रभाकर ना. पाटील सभागृह येथे नुकताच आरोग्य आणि सेंद्रिय पोषण परसबाग विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आयसीडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, प्रेरणा सामाजिक विकास संस्था अध्यक्षा स्वाती कमलेश कोरपे, संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक कमलेश कोरपे, सदस्य गोविंदा आंब्रे, पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, दीप्ती मोकल, उल्का कुलकर्णी, विनोदी मोकल, कल्पिता साळगावकर, गीताई कठोर तसेच अलिबाग तालुक्यातील प्रत्येक विभागातून १५ अंगणवाडी सेविका अशा एकूण १८० अंगणवाडी सेविका प्रशिक्षणासाठी उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रेरणा सामाजिक विकास संस्थापक कमलेश कोरपे यांनी प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी सेविकांना कार्यक्रम आणि सेंद्रिय पोषण परसबाग याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. आरोग्यासाठी सेंद्रिय शेती किंवा परसबाग कशी फायदेशीर आहे तसेच आरोग्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत व कोणते पदार्थ टाळले पाहिजेत या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा मूळ उद्देश ॲनिमिया फ्री इंडिया फोरम हा असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सदरील कार्यक्रम राबविण्यात येत असून आजपर्यंत अनेक अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित केले आहे. यावेळी आयसीडीएस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी महाराष्ट्र शासनामार्फत देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा, आरोग्य व स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका जिविता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांनी केले.