
“शर्वरीने केला प्रश्न; ‘मामी म्हटल्यावर कसं वाटतंय?” अमृता फडणवीसांनी दिले विनोदी उत्तर
मुंबई: छोट्या पडद्यावर ‘बस बाई बस’ हा नवा कार्यक्रम सुरु झाला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पहिल्या भागापासून लोकप्रिय ठरत असून प्रत्येक भागात दिग्गज आणि लोकप्रिय सेलिब्रिटी हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या हजेरी लावणार आहेत. यात नवोदित अभिनेत्री शर्वरी पेठकर यांनी अमृता फडणवीस यांना एक प्रश्न विचारल्यावर त्यांनी मिश्कीलपणे त्याचे उत्तर दिले. त्यामुळे या नव्या भागाकडे साऱ्यांचे डोळे लागले आहेत.
सध्या सोशल मीडियावर ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अमृता फडणवीसांनी अनेक गोष्टींवर भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ‘ज्यावेळी लोक मामी या नावाने हाक मारतात त्यावेळी नेमकं कसं वाटतं’, हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘बस बाई बस’ या कार्यक्रमात लवकरच अमृता फडणवीस सहभागी होणार असून तुम्हाला लोक मामी म्हणतात त्यावेळी कसं वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी खरं सांगू का..मला मज्जा येतं असं हटके उत्तर त्यांनी दिली. तसंच कुठे आसामला नेताय का? अशी कोपरखळीही मारली.
“देवेंद्रजींना माननीय मुख्यमंत्री म्हणजेच ‘मामू’ असं म्हणतात. आणि, त्यामुळेच तुम्हालाही ‘मामी’ म्हणतात. मग त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं?”, असा प्रश्न अमृताजींना विचारण्यात आला. त्यावर, “खरं सांगू का मला फार मज्जा येते..मग काय बाकी आज वेळ मिळाला वाटतं? कुठे आसामला नेताय का?”, असं हटके उत्तर देत अमृता फडणवीसांनी या प्रश्नाचं उत्तरं दिलं. तसंच आसामचा उल्लेख करत कोपरखळीही मारली.