
कुसुंबळे येथील अशोक पाटील यांचे निधन
सचिन पाटील (अलिबाग)
रायगड:कुसुंबळे येथील शेकापचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते कै.अशोक गणू पाटील यांचे नुकतेच दिनांक ०२/०८/२०२२ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. यावेळी निधनाची बातमी समजताच माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, आमदार पंडितशेठ पाटील, राजिप.सदस्या चित्राताई आस्वाद पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत पाटील यांनी कुसुंबळे येथील त्यांच्या रहात्या घरी भेट देवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
अशोक पाटील हे आयुष्यभर शेकाप चे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनच राहिले. त्यांनी राजिप माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील तसेच दत्ता पाटील यांच्या सोबत एकनिष्ठेने कार्य केले. शेकाप मधूनच ते १९८७-८८ मध्ये कुसुंबळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले. त्यांच्याच कारकिर्दीत १९८९ साली मोठा महापूर झाला. ज्याची भीतीदायक आठवण आजही कायम लोकांच्या मनात घर करून आहे आणि याच कारकिर्दीत मुख्यमंत्री शरद पवार यांनी या भागात स्वतः भेट देवून हा भाग दुष्काळी म्हणून जाहीर केला व यावेळी खूप मोठे सामाजिक कार्य शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांना घेवून अशोक पाटील यांनी केले. सर्पदंश, विंचूदंश, हाड मोडणे यावर आयुर्वेदिक रामबाण उपाय करण्यात ते प्रसिद्ध होते. सर्पदंश झालेल्या अनेकांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत.
त्यांच्याच कारकिर्दीत वाघविरा येथील रस्ता, पाचआंबेवाडी येथील पाण्याच्या टाकी बांधकामास त्यावेळचे विरोधी कार्यकर्ते हेमनाथ खरसंबळे यांना विरोध असतानाही सरपंच या नात्याने गावाच्या विकासासाठी पक्ष आड न आणता मंजुरी दिली यातून त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख नक्कीच होते आणि म्हणूनच विरोधकांच्या मनातही त्यांच्या बद्दल आदर होता. त्यांनी त्यांच्या कार्यातून अनेक माणसे जोडली होती. त्याचा प्रत्यय म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीसाठी परिसरातील जवळजवळ १५०० हुन अधिक जणांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुशिला पाटील, मुलगा प्रशांत पाटील, संतोष पाटील, संजय पाटील, मुलगी सुष्मा भगत, सून – प्रणिता (मिनोती) पाटील, सुवर्णा पाटील, ममता पाटील, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशविधी कार्य ११/०८/२०२२ रोजी होणार असून तेरावा रविवार दिनांक १४/०८/२०२२ रोजी त्यांच्या राहत्या घरी कूसुंबळे येथे सकाळी १० वाजता होणार आहेत. अशोक पाटील हे पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांचे काका होते.