
मराठी टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची : न्या. सिरपूरकर
नागपूर: कारण नसताना इंग्रजी बोलण्याचे फॅड वाढत असल्यामुळे आपली मातृभाषा मराठी आपण सर्वांनी मिळून टिकविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे, असे परखड प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर जोशी यांच्या ‘नीर-क्षीर’ लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र याप्रसंगी विशेष अतिथी होते.चाळीस वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत चंद्रशेखर जोशी यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांमधील निवडक लेखांचा हा संग्रह मुंबईच्या सदामंगल प्रकाशनाने काढला आहे. यातील विषयांची निवड आणि त्यांची मांडणी सुंदर झाली आहे, असा निर्वाळाही न्या. सिरपूरकर यांनी दिला.
पत्रकारितेच्या अनुभवाचा लाभ नवीन पिढीला देण्यासाठी जोशी यांनी आणखी पुस्तके लिहावी, असा सल्ला सुधीर पाठक यांनी यावेळी दिला. तर, पत्रकार होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता असली पाहिजे, अशी सूचना मैत्र यांनी केली. ज्येष्ठ लेखक मधुकरराव हुद्दार, वृक्षमित्र बाबा देशपांडे, सुनील औरंगाबादकर आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.