
भारताने पाकला नमवले
दुबई: पाकिस्तानचा दणदणीत पराभव करुन टीम इंडियानं आशिया चषक मोहिमेला विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 148 धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी अखेरच्या षटकात पार केलं. या विजयासह भारतानं गेल्या वर्षीच्या टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा वचपा काढला. त्याआधी पाकिस्तानचा डाव 19.5 षटकात 147 धावांत संपुष्टात आला. या प्रतिष्ठेच्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानी फलंदाजांवर नियंत्रण राखलं. पाकचा सर्वात धोकादायक फलंदाज कर्णधार बाबर आझमला अनुभवी भुवनेश्वर कुमारनं तिसऱ्याच षटकात माघारी धाडलं. बाबरनं केवळ 10 धावा केल्या.
त्यानंतर आवेश खाननं फखर झमानला 10 धावांवर बाद करुन आणखी एक मोठा अडसर दूर केला. पण मोहम्मद रिझवाननं एका बाजूनं खिंड लावून धरली होती. रिझवाननं इफ्तिकारसोबत 55 धावांची भागीदारी करुन पाकचा डाव सावरला. पण हार्दिक पंड्यानं ही जोडी फोडताना इफ्तिकारला 28 धावांवर बाद केलं. हार्दिकनं त्यानंतर लागोपाठ दोन धक्के देताना आधी सेट झालेला रिझवान आणि मग खुशदिल शाहची विकेट घेतली. रिझवाननं 42 चेंडूत 43 धावांची खेळी केली.
रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या इतर फलंदाजांना भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीपनं झटपट गुंडाळलं. भारताकडून भुवनेश्वरनं 4, हार्दिक पंड्यानं 3, तर अर्शदीप सिंगनं 2 आणि आवेश खाननं एक विकेट घेतली. पाकविरुद्ध हार्दिक पुन्हा प्रभावी पाकच्या फलंदाजीला मोठं खिंडार पाडली ती हार्दिक पंड्यानं. पंड्यानं या सामन्यात सेट झालेला रिझवान, खुशदिल शाह आणि इफ्तिकारची विकेट काढली. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात हार्दिक प्रभावी ठरला. याआधी 2016 साली मिरपूरमध्ये झालेल्या सामन्यात आठ धावात 3 विकेट घेतल्या होत्या. तर आज त्यानं 25 धावात तीन विकेट घेतल्या.