
आणि…विसावली पाखरे…! वैशाली अंड्रस्कर
लगबग सारी भेटण्याची…सोहळा अनुभवण्याची…आणि उरलेली शिदोरी काळजात बांधून नेण्याची. काय कुठला सोहळा म्हणता…? अहो, आताच नाही का लातूर नगरीत मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर च्या ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२२’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला. त्यासोबतच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, शैक्षणिक जीवनगौरव पुरस्कार आणि कवी संमेलनसुद्धा अनुभवले ना..!
हं हं.…आता आलयं ना लक्षात. पण वैशालीताई या लेखाला विसावली पाखरे का म्हणत आहेत…प्रश्न तरी मनी उमटलाच असेल…कारण भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात तर सगळी वर्दळच होती. मग विसावली कशी साहित्यिक पाखरे….सांगते सांगते ऐका जरा… जन्माच्या ट्यह् पासून तर अखेरच्या श्वासापर्यंत आपलं असतंच की धावणं…कधी पोटासाठी कधी पाठीसाठी…अहोरात्र निरंतर धावणे. नात्यांच्या विणीत कधी विस्कटणे..आसवांच्या धारांत कधी वाहणे…तर कधी तुटलेल्या ताऱ्यागत मन अधांतरी कोसळणे….या साऱ्यांना सावरता सावरता आयुष्य कसं निघून जातं कळतच नाही. वाटतं कधीतरी थांबावं एखाद्या निवांत ठिकाणी…बघावं स्वतःलाच स्वतःकडे आणि विचारावे मनाला….काय रे तू खूश आहेस ना…?
सांगा काय उत्तर येईल… नक्कीच…खात्रीचे उत्तर असेल…नाही रे अजूनही पुरतं जगलोच नाही…माझं माझं करता करता ओझंच वाहत राहिलो… आणि आता कळलं अरे, माझं तर जगायचं राहूनच गेलं…मग कुणी ओढतं रेघोट्या कागदावर अन् साकारलं जातं चित्र भावनांच…कुणी खरडतात ओळी वहीवर आणि बनत जाते काव्य अंतरीच्या वेदनेचं…कधी आनंदाच्या लहरीवर हेलकावण्याचं…पण हे सांगणार कुणाला… आणि कसं…या घड्याळाच्या काट्यासोबत चालणाऱ्या जगात कोण ऐकणार माझ्या संवेदना….पण असं हिरमुसून जाऊ नका…. आम्ही आहोत की मराठीचे शिलेदार समूह….ज्या समूहात आपणाला लाभतो विसावा… कविता, चारोळी, चित्रचारोळी, आणि हायकू या माध्यमातून परस्परांशी संवाद साधताना नकळत मनातील ती खोल दरी बुजवली जाते एकटेपणाची…. आणि धुमारे फुटतात मनाला…!
आता सांगा…मी विसावली पाखरे का म्हटले लेखाला..तर असंख्य प्रश्नांना दूर सारून फक्त आणि फक्त स्वतःसाठी… स्वतःच्या आनंदासाठी हा समूह एक कोटर निर्माण करून देतं…संध्यासमयी पक्षी जसे दिवसभराची लगबग विसरून निवांत पंख टेकवतात… त्याप्रमाणे कवीमनाचे साहित्यिक समूहाच्या कोटरात आपल्या कवितेचे पंख पसरतात आणि मनाला विसावा देतात…. त्याचबरोबर संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेली पाखरे सुद्धा आपापल्या घरातील चिंता दुःख विसरून काही क्षण आनंदाने घालविण्याच्या खटाटोपात लातूर नगरीत श्रांत झालीत….एकमेकांशी संवाद साधत आनंद उधळत राहिलीत….अशा या सर्व साहित्यिक रसिकांना नक्कीच विसाव्याची जाणीव अनुभवास आली असावी….खरे ना…!
चला तर मग पुढील विसावा मिळेपर्यंत आपल्या लेखणीतून शब्दांची फुले उधळू या…सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!
✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह