
भिमाई…..!
१४ एप्रिल…डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आपल्या भारतीय जनतेसाठी तो एक बहुमोल दिवस. कारण दीनदलित, गोरगरीब, मागासलेल्या, अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समस्त स्त्री-पुरुष वर्गाला प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्मदिन.
खरेतर भीमरावांचे कार्य मोजक्या शब्दांत मांडणे किंवा नेमक्या चौकटीत बसवणे…म्हणजे सागरातील मोती चाचपडणे होईल…तरीपण भीमोत्सव अंकाच्या निमित्ताने मला त्यांच्या आईविषयी जाणून घ्यावेसे वाटले. कारण जिजाऊ नसत्या तर शिवबा घडले नसते…तद्वतच भिमाई नसत्या तर भीमराव घडले नसते.
भिमाई…म्हणजेच भिमाबाई रामजी आंबेडकर यांचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे इंग्रजी सैन्यात सुभेदार होते. त्यांचा विवाहसुद्धा लष्करी सेवेत असलेल्या रामजी आंबेडकर यांच्यासोबत तेराव्या वर्षी झाला. याचाच अर्थ भिमाबाईंचे आयुष्य बालपणापासूनच हे एका शिस्तबद्ध वातावरणात गेले. त्यांचे छायाचित्र बघताना त्यांच्या चेहऱ्यावरील करारीबाणा आपसूकच आपल्या नजरेसमोर येतो. तेच तेज…तीच बुद्धिमत्ता आपल्याला बाबासाहेबांच्या कार्यात दिसून येते.
तसे पाहिले तर भीमरावांना मातृसुखाचे वरदान फारसे लाभले नाही. कारण भीमराव पाच वर्षांचे असतानाच मस्तकशूळ या आजाराने भिमाबाईंचे निधन झाले. मात्र बाळकडूच्या रुपातूनच आज जगात एक इतिहास घडला. बौद्ध धम्माच्या आधारे दीनांना मुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या….स्वतंत्र भारताला ‘भारतीय संविधान’ बहाल करुन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित करणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर आणि भिमाईस….भीमजन्मोत्सवानिमित्त विनम्र अभिवादन….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
मराठीचे शिलेदार समूह