
राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस, मविआ आक्रमक पवित्र्यात, सरकारही सज्ज
नागपूर : राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. सोमवारी, पहिल्या दिवशी सीमा प्रश्नाबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली होती. सोमवारी बेळगावात कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करत अटक केली. त्याचे पडसादही आजच्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. आज सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद, महापुरुषांचा अपमानाच्या मुद्यावर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. राज्य सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली.